आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे वारंवार वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वसामान्यांनीच पराभव केला, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.
सर्वसामान्यांनी वास्तव दाखवून दिले
कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, कसबा मतदारसंघातील रवींद्र धंगेकरांचा विजय हा मविआच्या एकजुटीचा विजय आहे. 28 वर्षांनंतर भाजपचा बालेकिल्ला ढासळला. येथील निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतल्या. रोड शो घेतले. वारंवार सांगत होते, आम्ही सर्वसामान्यांचे सरकार आहोत. मात्र, सर्वसामान्यांनीच त्यांना वास्तव दाखवून दिले.
राहुल कलाटेंमुळे चिंचवडमध्ये पराभव
अजित पवार म्हणाले, कसबा येथील विजय व चिंचवड येथील पराभव म्हणजे एकंदरीत 'थोडी खुशी, थोडा गम' अशी भावना आहे. मात्र, चिंचवडमध्ये भाजपमुळे आमचा पराभव झालेला नाही. तर, आमचेच बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे निवडणुकीत अपक्ष उभे राहिल्यामुळे आमची मते फुटली. राहुल कलाटे यांनी निवडणुकीला उभे राहू नये म्हणून आम्ही त्यांना समजावण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ऐकले नाही. राहुल कलाटे व मविआचे उमेदवार नाना काटे यांना मिळालेली एकत्रित मते पाहील्यास ती अश्विनी जगताप यांना मिळालेल्या मतांहून कितीतरी जास्त असल्याचे समजून येईल. म्हणजेच चिंचवडमध्ये बंडखोरी झाली नसती तर आम्ही सहज जिंकून आलो असतो.
भावनिक मुद्दा चालणार नाही
अजित पवार म्हणाले, कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. आजारी गिरीश बापट यांना प्रचारात भाजपने उतरवले. महाराष्ट्राने असे राजकारण कधी पाहीले नाही. मुक्ता टिळक आजारी असतानाही त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नेले होते. हे सर्व चुकीचे आहे. भाजपने या निकालापासून धडा घ्यावा. कसबा व चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुका भावनिक मुद्द्यावर जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, यापुढे भावनिक मुद्दे चालणार नाहीत, असा धडा या निकालाने दिला आहे. सर्वसामान्यांसाठी महागाई, बेरोजगारीचा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा असल्याचे या निकालाने स्पष्ट केले आहे.
हक्कभंग प्रस्ताव नैसर्गिक न्यायाला धरुन नाही
दरम्यान, विधानसभेचे कामकाज खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून बुधवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. विधिमंडळात अजित पवारांनी मागणी केली की,विधीमंडळात ज्यांनी खासदारांच्या वक्तव्यावर हक्कभंग दाखल केला त्याच सदस्यांना हक्कभंग समितीमध्ये घेण्यात आले हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरून नसल्याने ही समिती पुनर्गठीत करावी आज सभागृह सुरू होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हक्कभंग समिती स्थापनेच्या सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा उपस्थित केला.
समितीत अतुल भातखळकरांचा समावेश कसा?
अजित पवार म्हणाले, विधीमंडळात नियम व संकेत पाळले गेले पाहिजेत. खासदारांनी जे वक्तव्य केले त्यावरून अनेक सदस्यांनी आपले मत मांडले. त्यामध्ये अतुल भातखळकर यांचाही समावेश होता आणि त्यांनीच हक्कभंग दाखल केला. याशिवाय अनेक सदस्यांनी आपले मत व्यक्त केल्यानंतर हक्कभंग दाखल करून घेण्यात आला. तो मान्यही केला गेला. मात्र जी हक्कभंग समिती स्थापन करून सदस्य नियुक्त करण्यात आले. त्यामध्ये अतुल भातखळकर हे वादी असताना त्यांना हक्कभंग समितीमध्ये नियुक्त करण्यात आले. जे वादी आहेत ते न्यायप्रक्रिया कशी राबवू शकतात. हे नैसर्गिक न्यायाच्या नियमाला धरुन होणार नाही त्यामुळे समिती पुनर्गठीत करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
संबंधित वृत्त
पोटनिवडणूक निकाल:भाजपच्या बालेकिल्ला ढासळला; कसब्यात जनशक्तीचा धनशक्तीवर विजय, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी. भाजपच्या रासने यांनी निकालापूर्वीच माध्यमांशी बोलताना पराभव केला मान्य. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.