आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली. यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मौन सोडले आहे. पक्षप्रवेशानंतर ते नगरसेवक सेनेचे असल्याचे समजले, असा दावा अजित पवारांनी केला आहे.
सारथीवरुन सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, 'मी त्या दिवशी बारामतीत होतो. गर्दीत मी सगळ्यांना सांगत होतो, काळजी घ्या. तेव्हा काही वाहने आली. तिथे आमदार निलेश लंके आले होते. त्यांना विचारले की, काय काम आहे, तर ते मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचे आहे. मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात गमछे टाकले आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर कळले की, ते नगरसेवक शिवसेनेचे होते.'
'यानंतर मी निलेश लंकेंना याबाबत विचारल्यावर, त्यांनी सांगितले की, दादा ते भाजपात जाणार होते. राष्ट्रवादीने घेतले नाही, तर आम्ही भाजपात जाऊ, असे ते म्हणू लागले.' यानंतर पवार म्हणाले की, 'आम्ही फोडाफोडी करत नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी निलेश लंकेंना बोलावून याबाबत सांगितले आहे,' असे अजित पवारांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.