आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक सरकारच्या अरे ला, का रे ने उत्तर द्या. बोम्मईंना जशास तसे उत्तर द्यावे, असे आवाहन मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. तसेच मंत्री शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौऱ्याची पुढील तारीख जाहीर करावी, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
शिंदे सरकारचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी आजचा कर्नाटक दौरा रद्द केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य सरकार नमती भूमिका घेत असल्याचा आरोप होतोय.
नेमके प्रकरण काय?
सीमावर्ती भागातील जत तालुक्यातल्या गावांनी आम्ही कर्नाटकात जाणार असल्याचा इशारा दिला आणि राज्यात पुन्हा एकदा सीमावाद पेटलाय. त्यानंतर अक्ककोट, पंढपूर, नांदेड ते थेट सुरगाणा तालुक्यापर्यंत याचे लोण पोहचले. इथल्या अनेक गावांनी मुलभूत सोयी-सुविधांसाठी महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर सहा डिसेंबर रोजी मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील कर्नाटक दौऱ्यावर होते. मात्र, त्यांनी हा दौरा अचानक रद्द केला. महापरिनिर्वाणदिनी सीमावाद चिघळू नये म्हणून दौरा रद्द केल्याची भूमिका सरकारच्या वतीने मांडण्यात आली. आता त्यावर टीकेच झोड उठतेय.
देसाईंनी तारीख सांगावी...
अजित पवार यांनी कर्नाटक दौऱ्यावरून शिंदे सरकारला चांगलेच घेरले. ते म्हणाले की, आपल्या मंत्र्यांना बेळगावात प्रवेश न मिळणे, हे सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी जशास तसे उत्तर द्यावे. शंभूराज देसाई यांनी बेळगाव दौऱ्याची पुढील तारीख सांगावी. महापरिनिर्वाण दिन म्हणून दौरा रद्द केल्याचे सांगता. मात्र, तुम्हाला सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असतो, हे माहित नव्हते का, असा सवालही त्यांनी केला. तसेच सरकारकडून थातूर-मातूर उत्तरे देणे सुरू असल्याचेही ते म्हणाले.
समविचारी पक्ष सोबत
अजित पवार पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीत जे-जे समविचारी पक्ष येतील त्यांना सोबत घेण्याची तयारी आहे. काल उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली. याबाबत आम्हीही सकारात्मक भूमिका घेतली. आता आठ डिसेंबरला आम्ही एक पत्रकार परिषद घेऊ. या सतरा तारखेच्या महामोर्चापासून ते इतर प्रश्नांचीही उत्तरे देऊ.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.