आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवार यांनी निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करणार असल्याचे संकेत दिलेत. पवारांनी आज मुंबईतील पुस्तक प्रकाश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. मात्र, याला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर या कार्यक्रमस्थळीच ठिय्या मांडत या निर्णयाला विरोध केला. नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याचे साकडे घातले. मात्र, पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या. तेव्हा निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोन ते तीन दिवस द्या, असे आवाहन केले. कार्यकर्ते शांत झाले, तरच हा फेरविचार करू, असा निरोपही त्यांनी अजित पवारांमार्फत कार्यकर्त्यांना पोहचवला.
LIVE:
- शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांनी मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्यावे, असे सांगितले आहे. आपण पवार साहेबांना दैवत मानतो. तेव्हा आपल्या दैवताने सांगितलेले ऐकावे. इथल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी निघून जावे. नाष्टापाणी, जेवण करावे, असे सांगितले आहे. तुम्ही येथे बसलेला दिसला, तरी माझा निर्णय बदलणार नाही, असेही सांगितले आहे. उस्मानाबाद, बुलढाणाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. हे राजीनामा सत्र ताबडतोब थांबवले पाहिजे. माझ्या म्हणण्याला प्रतिसाद दिला. ऐकलेच पाहिजे, तरच निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचे सांगितले आहे.
- अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल.
- यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी. कार्यकर्त्यांनी जेवण करून यावे. सावलीत बसावे, असा फोनवरून शरद पवारांचा निरोप. सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांशी फोनवरून करून दिला संवाद.
- शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मनधरणी त्यांना भेट करून करणार आहोत. आता त्यांच्याकडेच भेटायला निघालो आहोत, छगन भुजबळ यांची माहिती. त्यांचा निर्णय आमच्यासाठी धक्का असल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक संपली. शरद पवारांची भेट घेणार. राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी करणार.
- लोकशाही जगते की नाही माहिती नाही. जाती-जातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण होत आहे. पुढच्या पिढीला काय देणार, अशी अवस्था आहे. अशात शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यांचा हा धक्का लोकांना पचत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी दिली. त्यांनी राजीनामा दिल्याचे दुःख. तो त्यांनी परत घ्यावा. तुम्ही तुमच्यासारखे पर्यायी नेतृत्व तयार करून राजीनामा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
- आमदार रोहित पवार, आमदार चेतन तुपे, सुभाष देसाई, अनिल देसाई शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर दाखल.
- धाराशिवचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी राजीनामा दिला.
- शरद पवारांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला. राज्य विद्युत दलाची तुकडी बोलवण्यात आली आहे. सिल्वर ओक परिसरातील रस्त्यावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. वाय बी सेंटरवर कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
- अनुभवी, जेष्ठ नेत्याने निवृत्ती घेणे खटकणारे आहे. ही घटना राष्ट्रवादी कॉंग्रेसची अंतर्गत बाब आहे. त्यावर आताच बोलणे योग्य राहणार नाही असे काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी भूमिका मांडली.
- सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची वाय बी सेंटरवर बैठक सुरू
- शरद पवारांसह कार्यकर्ते कार्यक्रमातून बाहेर पडले आहेत. यावेळी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पवार निवासस्थानी रवाना होत आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांनी पवारांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.
- शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार-शरद पवार अशी घोषणाबाजी सुरू केली. तसेच शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी गळ घातली. स्वतः अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी काही केल्या घोषणाबाजी थांबवली नाही. त्यानंतर शरद पवार यांनी सभागृहातच अजित पवारांशी संवाद साधला.
- अजित पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शरद पवारांच्या निवृत्तीबाबत एक समिती स्थापन करून निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर केला जाईल. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. या समितीमध्ये मी, सुप्रियाताई सुळे आणि सारे आपले घरचेच असतील, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, या उत्तरानेही कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. शरद पवारांनी आत्ताच निर्णय मागे घ्यावा, या मागणीवर कार्यकर्ते ठाम आहेत.
- प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. शरद पवारांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता. याची आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. शरद पवार हा निर्णय मागे घेतील. त्यांनी तात्काळ काही ठोस आश्वासन आम्हाला द्यावे, अशी मागणी यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी केली.
- आम्ही पवार साहेबांकडे पाहून मते मागतो. ते बाजूला गेले, तर कोणाकडे पाहावे. ते पदावर रहावेत. त्यांना परस्पर असा निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांचा हा निर्णय आम्हाला आणि देशातल्या कुठल्याच माणसाला मान्य होणार नाही. त्यांनी हा निर्णय कुठल्याही परिस्थितीत मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
- शरद पवारांकडे बघून आम्ही राजकारण केले. त्यांनी अलीकडच्या काळात भाकरी फिरवण्याची भाषा केली. पवार साहेब मी तुम्हाला सगळा अधिकार देतो. तुम्ही आमच्या सगळ्यांचे राजीनामे घ्या. पवार कोणा नवीन लोकांच्या ताब्यात द्यायचाय तो द्या. मात्र, तुम्ही पक्ष सोडून बाजूला जाणे कोणाच्याही हिताचे नाही. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुणीच काम करू शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल, तर आम्ही थांबतो, असे साकडे जयंत पाटील यांनी घातले. पवारांना आवाहन करताना जयंत पाटलांना आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी पवारांनाही अश्रू अनावर झाले.
- दरम्यान, छगन भुजबळ यांनी यावेळी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. अजित पवार यांनी पवारांच्या राजीनाम्याबाबत समिती निर्णय घेईल, असे म्हटले होते. मात्र, ही कमिटी वगैरे आम्हाला मंजूर नाही. तुम्ही राजीनामा मागे घेतलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी यावेळी छगन भुजबळ यांनी केली.
- जितेंद्र आव्हाड यांनीही यावेळी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. तसेच आपला निर्णय आम्हाला मान्य नाही, असे सांगितले. यावेळी त्यांनाही अश्रू अनावर झाले.
- आपण सगळे एकत्रच पक्षात काम करणार आहोत. मी फक्त पदावरून बाजूला जातोय. तुमच्यापासून मी बाजूला नाही. तुमच्यासोबत सर्व कामात आहे, असे म्हणत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
- सुनील तटकरे यावेळी म्हणाले की, तुम्ही आमच्यासोबत आहात. आपली वटवृक्षासारखी छाया आमच्यावर आहे. मात्र, तुम्ही निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.
- आपण निर्णय बदलला नाही, तर महाराष्ट्राच्या अनेक खेड्यात आत्महत्या केल्याचे चित्र पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी अंकुश काकडे यांनी केली.
- हसन मुश्रीफ यांनीही यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली. दिलीप वळसे-पाटील यांनीही हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.
- आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा. मात्र, आपण आपला राजीनामा आजच्या आज मागे घ्या, अशी मागणी यावेळी नरहरी झिरवळ यांनी केली.
- देशावर संकट असताना शरद पवारांनी पक्षाच्या अक्षध्यपदावरून निवृत्त होणे योग्य नाही. आपण लोकशाही मानता. तुमचा हा निर्णय आम्हाला पटलेला नाही. त्यामुळे तुम्ही निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
- शरद पवार म्हणजेच पक्ष आहे. मात्र, त्यांनी निर्णय घेतला म्हणजे ते पक्षात राहणार नाहीत, असे नव्हे. हा परिवार असाच सुरू राहणार आहे. परवाच पवार साहेबांनी सांगितले की, भाकरी फिरवायचे असते. मी काकूंशीही बोललो, पण साहेब भूमिका मागे घेणार नाहीत. त्यांनी नवीन अध्यक्षाचा निर्णय घेतला आहे. आपण त्या अध्यक्षाच्या पाठिशी ठाम राहू. वय झाल्यानंतर नवीन लोकांना आपण संधी देतो, मार्गदर्शन घेतो. तशा गोष्टी होतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
- शरद पवारांच्या जीवावर पक्ष चालणार आहे. लोकांनी भाकरी फिरवायची म्हणजे इतर कोणती भाकरी फिरवायची असा अर्थ घेतला. मात्र, साहेब निर्णयावर ठाम आहेत. काळानुसार काही निर्णय घ्यावे लागतात. शरद पवारांसमोर नवीन अध्यक्ष झाला, तर तुम्हाला का नको आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष तयार होईल. त्यामुळे आता काही खरे नाही. उगीच भावनिक होण्याचे कारण नाही. कालच १ मे रोजी ते जाहीर करणार होते. मात्र, वज्रमूठ सभा असल्याने आज हा निर्णय जाहीर केल्याचे ते म्हणाले.
- अजित पवारांच्या आवाहनानंतरही नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा यावर ठाम. शरद पवारांनी अध्यक्ष राहावे आणि कार्याध्यक्षाची निवड करावी, अशी नेत्यांची मागणी.
- सुप्रिया सुळे यांना बोलू द्या. कार्यकर्त्यांचा आग्रह. मात्र, सुप्रिया तू बोलू नकोस, असा मोठा भाऊ म्हणून यावेळी अजित पवारांनी सल्ला दिला.
- माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे. साहेबांच्या समक्ष जे काही तुम्ही बोलत आहात. तुमची भावना सर्वांना समजली. जे तुमच्या मनात आहेत, तेच आमच्या मनात आहे. मात्र, परत तीच-तीच चर्चा करण्यात अर्थ नाही. आम्हाला साहेबांशी बोलू तरी द्या, असे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले.
- तुम्ही घोषणा देत राहिलात तर कसे होईल. आम्ही सगळ्यांसमोर शरद पवारांसोबत कसे चर्चा करू. एका बाजूला तुम्ही शांत रहा. तुमच्या मनासारखे घडवून आणतो. मात्र, थोडा वेळ द्यावा. एवढ्या मोठ्या माणसाला तुम्ही असे नाही म्हणू शकत नाही, असे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले. मात्र, कार्यकर्ते राजीनामा मागे घेण्यावर ठाम होते.
- शरद पवार साहेबांच्या जेवणाची वेळ झाली आहे. तुम्ही त्यांच्याशी असे वागणार का. त्यांना थोडा वेळ द्या. तास-अर्धातास विश्रांती करू द्या. नंतर त्यांना भेटायला जाऊ द्या, असे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले.
- शरद पवारांच्या जेवणाची एक ठराविक वेळ असते. त्यांना जाऊ द्या. आपण निर्णय घेऊ, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले. प्रफुल्ल पटेल यांनीही तेच आवाहन केले. मात्र, कार्यकर्ते तरीही राजीनामा मागे घेण्याच्या मागणीवर ठाम होते.
- नवाब मलिकांच्या मुली यावेळी उपस्थित होत्या. आमच्या पाठिमागे आपण कठीण काळात खंबीर उभे राहिलात. आपण आपला निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
- शरद पवार जोपर्यंत मागे घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही अन्न-पाणी त्याग करून उपोषण करू, अशी भावना यावेळी काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
संबंधित वृत्तः
लोक माझे सांगाती:अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.