आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राज'कारण:अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडले आहेत का? शरद पवारांच्या राजीनाम्यावरील भूमिकेने पुन्हा चर्चा सुरू

मयूर वेरुळकर । छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली 3 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक नेता शरद पवारांनींच अध्यक्ष राहावे, असे म्हणत आहेत. तर दुसरीकडे एकट्या अजित पवारांनी शरद पवार यांच्या राजीनामा देणे योग्य आहे, पक्षाला नवा अध्यक्ष देण्याची गरज आहे, असे म्हटले होते. मात्र, यावरून ते एकटे पडल्याचे चित्र दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला असून, त्यांनीच पक्षाच्या अध्यक्ष पदावर रहावे असे सांगितले आहे. यामुळे आता अजित पवार यांच्या एकटे पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, विश्लेषक अजित पवारच काय सुप्रिया सुळे यांनाही हा निर्णय पटल्याचे म्हणत आहेत. नेमके काय, जाणून घेऊयात.

अजित पवारांवरील लक्ष हटले!

गेली काही दिवस राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी आम्ही अजित पवार यांच्यासोबत आहोत, तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे म्हटले होते. तर काही आमदारांनी अजित पवार सोडले तर विधिमंडळात पक्षाचा सक्षम असा नेता नाही असे वक्तव्य केले होते.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर अजित पवारांनी मी पक्षसोडणार नसल्याचे जाहीर केले. दरम्यानच्या काळात खासदार शरद पवारांनी भाकरी उलटली नाही तर करपते म्हणत पक्षात बदल करण्याचे संकेत दिले. आणि पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेद्र आव्हाड, छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा दुसऱ्या व्यक्तीकडे देऊ नये, ती स्वत: कडेच ठेवावी, अशी मागणी केली. मात्र,शरद पवारांच्या निर्णयावर अजित पवारांनी एकट्याने हा निर्णय कधीना कधी घ्यावाच लागला असता, पक्षाचा नवा अध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वात पक्षाचे कार्य सुरू ठेवेल असे म्हणत मत व्यक्त केले होते. हा राजीनामा केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसवर विरोधकांकडून करण्यात येत आहे.

अजित पवारांकडून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न

ज्येष्ठ पत्रकार व लेखक अरुण खोरे म्हणाले की, अजित पवारांना स्वतंत्र भूमिका घ्यायची आहे. जी शरद पवारांपासून तर प्रादेशिक पातळीवर जयंत पाटील याच्यापर्यंत मान्य नसावी, अशी शंका घ्यायला मागच्या काही आठवड्यातील घटनाचा संदर्भ आहे. तरी देखील अजित पवार स्वत:चे राजकीय बळ वापरून वेगळी भूमिका घेऊ शकतात असे म्हणायला वाव आहे. पवारांच्या राष्ट्रव्यापी नेतृत्वाच्या दडपणाखाली अजित पवारांचे व्यक्तिमत्व आहे. ते शरद पवारांना डावलून वेगळा असा निर्णय पक्षात राहून घेऊ शकत नाहीत. आत्ता कदाचित त्याचा बाहेर पडण्याचा अजित पवारांचा प्रयत्न सुरू आहे.

पुस्तकातील पानामुळे चर्चांना उधान

दरम्यान शरद पवारांच्या आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती'मधील एका पानावर पहाटेच्या शपथविधीबद्दल पवारांनी त्यांची मांडलेली भूमिका पाहता अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदावर 2024 ला का आत्ताचा दावा सांगतो या विधानानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, पक्षात वाढणारे अजित पवारांचे वलयाची हवा काढून घेण्यासाठी शरद पवारांनी हे भाकरी उलटविण्याचे वक्तव्य आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलेले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. 'लोक माझे सांगाती', या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजितनं उचललेले पाऊल अत्यंत गैर होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनंच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.

सामनातून अध्यक्षपदावर वक्तव्य

राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षावर कोण? अशा चर्चा रंगलेल्या असताना सामना वृत्तपत्राद्वारे यावर सूचक विधान करण्यात आले आहे. या अग्रलेखानुसार, अजित पवारांचे राजकारणातील अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. सुप्रिया सुळे दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. संसदेत त्या उत्तम काम करतात, मात्र भविष्यात त्यांना पक्षाचे नेतृत्व मिळाले, तर वडिलांची उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पवारांनी राजीनामा देताच अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या प्रसंगावरही यात बोट ठेवण्यात आले आहे.

सुप्रिया सुळे, अजितदादांना पवारांचा निर्णय पटलेला

राजकीय विश्लेषक विजय चोरमारे म्हणाले की, राजीनामा देण्याआधी शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांशी चर्चा केली होती. तेव्हा अजित पवारांनी त्यांना विरोध केला असेलच. मात्र, शरद पवारांनी त्यांना पुढील काही गोष्टी सांगून आपले मत पटवून दिले. अजित पवार यांना सर्व परिस्थिती माहिती असताना राजीनामा परत घ्या म्हणणे म्हणजे नाटक ठरेल म्हणून अजित पवारांनी तशी भूमिका घेतली नाही. सुप्रिया सुळे यांनी देखील शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा असे म्हटले नाही, कारण त्यांना शरद पवारांनी राजीनामा देण्यामागची कारणे पटवून दिली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पवारांशी दीर्घ चर्चा केल्यानंतर त्यांनीही शरद पवार राजीनाम्यावर ठाम आहेत, असेच सांगितले होते. आता केवळ कार्यकर्त्यांचा दबाव आहेत तर तुम्ही विचार करावा इतकाच आता मुद्दा आहे.