आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच काहींच्या अश्रूंचे बांधही फुटले. सर्व जण ‘साहेब निर्णय मागे घ्या,’ असे विनवण्या करून सांगत होते. अशा भावनिक वातावरणात अजित पवारांची “दादागिरी” मात्र नजरेत भरली. ‘ए गप्प बस..’ असे ते पदाधिकाऱ्यांना दरवडावत होते. बहीण सुप्रिया सुळेंना तर ‘तू बोलू नको,’ असे जाहीरपणे आदेश त्यांनी दिला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना ‘बस झालं. जा आता घरी’ असं सुनावत होते. उपोषणाची धमकी देणाऱ्या कार्यकर्त्याला ‘बस्स, आताच उपोषणाला’ असे सुनावत होते. पत्रकारांशी बोलतानाही उसळत होते. जणू एखाद्या सहकारी संस्थेच्या सभेत स्वत:चे म्हणणे रेटून नेणारा नेता त्यांच्यात संचारला होता.
पवारांच्या घोषणेनंतर व्यासपीठावर शांतता होती. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर होणं, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, छगन भुजबळ यांची बोलती बंद होणं, दिलीप वळसे आणि अन्य नेत्यांना शब्द फुटत नव्हते. दुसरीकडे फक्त अजितदादाच निवृत्तीच्या निर्णयाचे ठामपणे समर्थन करताना दिसत होते. कार्यकर्त्यांना सुनावताना ‘भावनिक होऊ नका..’ असे सांगत होते. ‘कधी ना कधी तरी ही वेळ येणारच होती’ असं सांगत सर्वांनी हा निर्णय स्वीकारावा असं जणू सुचवत होते. सभागृहाची एक बोली होती आणि दादांची देहबोली मात्र दुसरंच काहीतरी सांगत होती. पक्षाची सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी अप्रत्यक्षपणे दबाव आणल्याचीही चर्चा होती.
अजितदादा म्हणत होते, ‘पवार साहेब अध्यक्ष नसले म्हणजे पक्षात नाहीत असे होणार नाही. त्यांच्या वयाचा विचार करून नव्या नेत्याकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली तर नवे अध्यक्ष पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील.’
नेत्यांकडून कार्याध्यक्षाचा पर्याय, पण पवार म्हणाले, ‘मीही हट्टी,’.. सुप्रिया सुळेंकडे सोपवू शकतात नेतृत्व
निवृत्तीच्या निर्णयापासून माघार घेणार नसल्याचे संकेत शरद पवारांनी सायंकाळी ‘सिल्व्हर ओक’वरील बैठकीतही दिले. आता त्यांच्या जागी कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय समितीतील ज्येष्ठ नेत्यांकरवी घेण्यास पवार भाग पाडतील, अशी शक्यता वर्तवली जाते. राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांची पवारांच्या घरी सुमारे दोन तास बैठक झाली. या सर्वांनी पवारांना निवृत्तीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनवणी केली. हवे तर कार्याध्यक्ष नेमा पण आपण पक्षाध्यक्ष राहा, असे या नेत्यांनी आवाहन केले. पण पवार निर्णयावर ठाम राहिले. पदाधिकारी उपोषण, राजीनाम्यावर ठाम असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर मीही तितकाच हट्टी असल्याचे त्यांनी सांगितले. पण नेत्यांची समजूत काढण्यासाठी त्यांनी दोन दिवस विचार करून सांगतो, असे सांगून वेळ मारून नेली.
नवा पक्षाध्यक्ष निवडण्यासाठी समिती
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान (महिला आघाडी), धीरज शर्मा (युवक आघाडी), सोनिया दुहन (युवती आघाडी).
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.