आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेवरून आज अजित पवार यांनी राज ठाकरेंना सुनावले आहे. सध्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषणे केली जात आहे. मात्र, शाहु-फुले-आंबेडकरांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राला चिथावणीखोर भाषणे पुरवडणारी नाहीत. एवढे दिवस झोपला होता काय, अशा शब्दांत अजित पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
आज शिर्डीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात कित्येत वर्षांपासून लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. सामान्यांच्या या एकोप्यामुळेच जातींमध्ये, विविध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होत नाही. मात्र, काही पक्षाचे नेते वेगवेगळे भोंगे लावायला सांगून समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याच काम करत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली.
भाषण करणे सोपे आहे!
केवळ भाषण करणे सोपे आहे. मात्र आता त्यांनी अचानक घेतलेल्या या भुमिकेमुळे त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक त्यांना विरोध करत आहे. आम्हाला निवडून यायच आहे. तुम्ही काय सांगू लागलात, असा प्रश्न हे नगरसेवक विचारत आहे. त्यामुळे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असली वक्तव्य करू नका. त्यामुळे तुम्हालाही फायदा होणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
एसटी संपकऱ्यांबाबत उद्या निर्णय घेऊ!
दरम्यान, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी 15 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याप्रमाणे ते कामावर रुजू झाले नाही तर राज्य सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यास मोकळे आहे, असेही न्यायालायने स्पष्ट केले आहे. यावरदेखील अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. एसटी कर्मचाऱ्यांना 31 तारखेपर्यंतच कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाने त्यांना आणखी मुदत वाढवून दिली आहे. आतातरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावे, असे आवाहन अजित पवारांनी केले. तसेच, कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी भेट घेऊन चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार देण्यासाठी प्रयत्त करू!
एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे न घेतल्यास त्यांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होईल. तसेच, या संपामुळे राज्यातील ग्रामीण भागामधील मुला-मुलींचीही अडचण होत आहे. त्यामुळे संप ताणू नका. एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यासाठी राज्य सरकार पुर्ण प्रयत्न करेल, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.