आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवार यांनी २ मे रोजीच्या कार्यक्रमात निवृत्तीचा निर्णय जाहीर केला तेव्हा सामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनीच विरोध केला. एकमेव अजित पवार हे त्यांच्या निर्णयाचे समर्थन करत होते. तीव्र भावना व्यक्त करणाऱ्यांना खडसावतही होते. ‘पवार साहेबांच्या वयाचा विचार करता त्यांच्यासमक्ष नवे नेतृत्व निवडण्यास काय हरकत आहे. मी काकींशीही (प्रतिभा पवार) बोललोय, साहेब निर्णय मागे घेणार नाहीत,’ असे त्यांनी पवारांसमक्षच स्पष्ट केले होते. मात्र निवड समितीच्या बैठकीत शुक्रवारी सर्वांच्या सुरात सूर मिसळत निर्णय मागे घेण्याच्या ठरावावर दादांना सही करावी लागली. शरद पवारांनीही निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. तेव्हा सर्व कार्यकर्ते खुश झाले. फक्त अजितदादा तोंडघशी पडले.
त्यामुळे पवारांच्या पत्रकार परिषदेकडेही त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे पुन्हा एकदा दादांच्या नाराजीची, ते दिल्लीला गेल्याचीही चर्चा रंगली. त्यावर सारवासारव करताना पवार म्हणाले, ‘सर्व कार्यक्रमांना सर्वच नेत्यांनी उपस्थित राहावे असे नसते. कुणी आहे, कुणी नाही असा श्लेष करण्याची गरज नाही. कुणाला पक्ष सोडून जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. पण आमच्या पक्षात असे कुणी नाही. अजित पवार हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा चुकीच्या आहेत,’ असे पवारांनी स्पष्ट केले.
अजित पवार दिल्लीला गेले आहेत का, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, कुणाला कोणत्याही पक्षात जायचे असेल तर नेतृत्वाने थांबण्यासाठी सांगण्याची काही आवश्यकता नाही. अशी परिस्थिती असेल तर अध्यक्षपदावर थांबून कंट्रोल केले जाऊ शकते, यावर लक्ष दिले पाहिजे. इतके मला तरी समजते, असे पवार यांनी स्पष्ट केले.
‘तुमचा उत्तराधिकारी कोण?’, असा सवाल केला असता पवार म्हणाले, ‘राजकीय पक्षात उत्तराधिकारी ठरवला जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीचा बॅकअप कोण, असा पुढचा प्रश्न केला असता ते म्हणाले, आमचे सर्व नेते पक्षाचा बॅकअप आहेत. त्यांच्यात राज्य व देश चालवण्याची क्षमता आहे, म्हणून मी निवृत्तीचा विचार केला होता.’ तुम्ही राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा अजित पवार यांनी संमती दिली होती. आज निवृत्तीचा निर्णय रद्द करताना अजित पवार नाहीत, या प्रश्नावर “माझ्या निवृत्तीची अजितला कल्पना होती. इतरांना ती नव्हती,’ असा खुलासा पवार यांनी केला.
अजित पवारांनीही केले निर्णयाचे स्वागत
कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करून शरद पवार साहेबांनी पक्षाच्या अध्यक्षपदी राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा आहे. महाविकास आघाडी व देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष उज्ज्वल यश संपादन करेल. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया नंतर अजित पवारांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
दौऱ्यामुळे प्रेसला अनुपस्थित : अजित पवार
शरद पवारांची पत्रकार परिषद साेडून अजित पवार पुण्याच्या दिशेने निघाले. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, ६ तारखेपासून माझा दौंड, कर्जत दौरा आहे. पुढे १२ तारखेपर्यंत माझा विविध भागांत दौरा आहे. त्यामुळे मी पत्रकार परिषदेला हजर राहू शकलाे नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.