आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे अधिवेशन:अजित पवारांचे नाराजीनाट्य, भाषण करण्याची संधी मिळाली नाही; दोन वेळा व्यासपीठ सोडले

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी पक्षातील क्रमांक दोनचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भाषण करण्याची संधीच देण्यात आली नाही. त्यात त्यांनी दोन वेळा व्यासपीठ सोडल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. परंतु अजित पवार यांनी त्याचा इन्कार केला.

तालकोटरा स्टेडियममध्ये रविवारी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. मात्र यात अजित पवार यांचा समावेश नव्हता. अधिवेशनात पक्षप्रमुख शरद पवार यांच्या भाषणापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाषण करतील अशी घोषणा झाली. त्या वेळी अजित पवार यांना बोलायला द्या, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या. कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरू असताना अजित पवार व्यासपीठावरून निघून गेले. जयंत पाटील यांचे भाषण झाल्यानंतर अजित पवार यांचे नाव पुकारण्यात आले. मात्र त्या वेळी ते व्यासपीठावर नव्हते.

अजित पवार सभागृहात नसल्याने त्यांना आणण्यासाठी त्यांच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे गेल्या. ते सभागृहात परत आले. मात्र तोपर्यंत शरद पवार यांच्या समारोपाच्या भाषणाला सुरुवात झाली होती.

यामुळे अजित पवार यांना भाषण करता आले नाही. हा सगळा गोंधळ शरद पवार यांच्या समोरच घडला. मग सारवासारव करत खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, अजित पवार हे स्वच्छतागृहात गेले आहेत. ते थोड्याच वेळात येतील. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नव्या झेंड्याचे अनावरण झाले. तोपर्यंत अजित पवार व्यासपीठावर येतील अशी अपेक्षा होती. पण अजित पवार पोहोचले नाहीत. त्यामुळे शेवटी शरद पवार यांचे समारंभाचे भाषण झाले. दिल्लीत आयोजित हे आठवे राष्ट्रीय अधिवेशन होते. देशभरातून विविध मान्यवर आले होते. त्यांच्यासमोर बोलणे उचित राहणार नाही, त्यामुळे बोललो नसल्याचे अजित पवार यांनी माध्यमांसमोर सांगितले. यावेळी ७ हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोदींचा दौरा अन् आता पक्षाचे अधिवेशन : संपूर्ण अधिवेशनात अजित पवारांचे भाषण झालेच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू (जि. पुणे) येथील कार्यक्रमात अजित पवारांना बोलू दिले गेले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून महाराष्ट्राचा अपमान झाल्याची टीका केली होती. आता खुद्द पक्षाच्या अधिवेशनात त्यांना स्थान मिळाले नाही. याची चर्चा रंगली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के तरुणांना प्राधान्य

पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये नवीन नेतृत्व तयार करता येऊ शकते. यासाठी या निवडणुकांत ५० टक्के तरुणांना संधी देणे सक्तीचे असेल. ही अशी घोषणा शरद पवार यांनी केली. तसेच दिल्लीसमोर झुकणार नाही, असे सांगून पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

बातम्या आणखी आहेत...