आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते,’ असे विधानसभेत वक्तव्य करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात राज्यात भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. हे प्रकरण पक्षाच्या अंगलट येत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी माध्यमांसमोर येत अजित पवारांच्या मुद्द्याचे खंडन केले.
‘छत्रपती संभाजी महाराजांना कुणी धर्मवीर म्हणत असेल किंवा कुणी स्वराज्यरक्षक म्हणत असेल तर काहीच वावगे नाही. कारण संभाजी महाराज सर्वांच्याच श्रद्धेचा विषय आहेत. पण महापुरुषांवरून अकारण वाद निर्माण करू नये,’ असे सांगत पवारांनी अजितदादांविरोधातील रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार लवकरच समोर येऊन भूमिका मांडतील,’ असेही ते म्हणाले.
अजित पवारांविरोधातील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न
आव्हाडांवर भाष्य टाळले
राष्ट्रवादीचे अजून एक नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ‘औरंगजेब क्रूर नव्हता,’ असे ट्वीट केेले होते. त्यांच्याविरोधातही राज्यभर संताप व्यक्त होत आहे. पत्रकारांनी याबाबतही विचारणा केली असता शरद पवार म्हणाले, ‘अजित पवार काय म्हणाले हे मी टीव्हीवर एेकले होते, पण जितेंद्र आव्हाड काय बोलले ते मला माहीत नाही. सगळ्यांच्या बोलण्यावर स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही.”
भाजपचेही कान टोचले
संभाजी महाराजांबाबत संघप्रमुखांनी पूर्वी केलेले लिखाण कुणालाच पसंत पडणार नाही. पण आता ते उकरून काढून वातावरण खराब करण्यात अर्थ नाही, असा टोलाही पवारांनी लगावला. ठाण्यातही काही नेत्यांना धर्मवीर म्हटले जाते, असे आनंद दिघेंचे नाव न घेता पवार म्हणाले.
‘देव, देश आणि धर्माचा परिपाक असलेले स्वराज्य राखले म्हणून छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक’ राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर ही बिरुदावली लावली तर ती त्यांना फक्त कैदेपासून ते बलिदानापर्यंतच्या मर्यादेत ठेवते. स्वराज्यरक्षक म्हणणे जास्त व्यापक. कारण नवव्या वर्षापासून त्याग करत त्यांनी स्वराज्य राखले. देव, देश व धर्म या तिन्हीचा परिपाक म्हणजे स्वराज्य.’
कोण काय म्हणाले?
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
^राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही. धर्मवीर संभाजी महाराजांविषयी अजित पवार यांच्याकडून असे वक्तव्य अपेक्षित नव्हते. यापुढे महापुरुषांचा अपमान जनता कधीच खपवून घेणार नाही.
सुप्रिया सुळे, खासदार राष्ट्रवादी
^एखाद्याने वेगळा विचार मांडला तर इितहासतज्ज्ञांच्या उपस्थितीत त्यावर चर्चा व्हायला हवी. राज्यात महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्न आहेत. मात्र हे अपयश झाकण्यासाठी भाजप असे आरोप करून आंदोलन करत आहे.
संजय राऊत, खासदार उद्धवसेना
^छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साधा निषेध करू शकले नाही. अन् आज त्यांचेच लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरले आहेत. ”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.