मुंबई / महात्मा फुले योजनेतील सर्व लाभार्थी झाले कर्जमुक्त, राज्यात थकीत शेतकऱ्यांना आता पीक कर्ज मिळणार

  • खरिपाच्या तोंडावर उद्धव ठाकरे सरकारकडून मिळाला दिलासा

दिव्य मराठी

May 23,2020 08:33:00 AM IST

मुंबई. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जरी कर्जमाफीची रक्कम अद्याप जमा झालेली नसली तरीही अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपात पीक कर्ज मिळणार आहे. सहकार विभागाने हा निर्णय घेतला असून ग्रामीण, व्यापारी व सहकारी बँकांना राज्य सरकारने शुक्रवारी तसे आदेश दिले आहेत.

ठाकरे सरकारने सत्तेवर येताच शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा २७ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णय जारी झाला. त्यानंतर लाभार्थींच्या याद्या प्रसिद्ध झाल्या. त्यातील १९ लाख थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने रक्कम भरली आहे. कोरोना व लाॅकडाऊनमुळे सरकारचे आर्थिक स्रोत आटल्याने योजना थंडावली आहे. खरीप हंगाम आला असताना उर्वरित शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा प्रश्न ऐरणीवर होता. त्यामुळे ज्यांचे नाव कर्जमाफी योजनेत आहे, मात्र त्यांच्या थकीत कर्जाचे पैसे अद्याप बँकांना सरकारकडून मिळाले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, असे आदेश सरकारने काढले आहेत.

४४ हजार कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट :

खरिपासाठी ४४ हजार कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. आपण थकबाकीदार असल्याने यंदा कर्ज मिळेल की नाही, अशी शंका शेतकऱ्यांत होती. ती आता दूर झाली आहे. थकीत शेतकऱ्यांना कर्ज दिल्यास त्याने पूर्वी घेतलेल्या पण अद्याप सरकारने ती रक्कम अदा न केलेल्या रकमेचे १ एप्रिल २०२० पासूनचे व्याजही सरकार बँकांना देणार आहे.

अखेर शेतकऱ्यांची घालमेल संपली

कर्जमाफीला पात्र आहोत, पण अद्याप खात्यात पैसे जमा झाले की नाही? शेतकरी याची बँकात जाऊन खातरजमा करत होते. नव्या जीआरमध्ये कर्जाची रक्कम सरकारकडून येणे, अशी नोंदवावी, असे आदेश सरकारने काढले आहेत. त्यामुळे कर्जमुक्ती योजनेतील सर्व पात्र शेतकरी आता कर्जमुक्त झाले आहेत.

सरकारकडून येणे, अशी नोंद...

महात्मा फुले योजनेत पात्र आहे, पण त्याचे पैसे अद्याप सरकारने अदा केले नाहीत, त्यांची खाती एनपीए किंवा थकीतमध्ये आहेत. त्या खात्यांवर सरकारकडून येणे, अशी नोंद करावी आणि संबंधित थकीत शेतकऱ्यास पीक कर्ज द्यावे, असे आज सहकार विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.

X