आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र बंद:आघाडीचा आज महाराष्ट्र बंद, अन्नदात्यासाठी बंद पाळण्याचे तिन्ही पक्षांचे आवाहन

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये बंदमधून वगळली

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ उद्या, सोमवारी (ता. ११) राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लखीमपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन केली आहे. रविवारी रात्री १२ वाजेपासून हा बंद सुरू होणार आहे. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जनआंदोलनाची संघर्ष समिती तसेच अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने बंदला पाठिंबा दिला आहे.

बंदला मुंबई डबेवाला असोसिएशनने पाठिंबा दिला असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. या बंदमध्ये सरकारला पाठिंबा देणारे इतर पक्ष सहभागी झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनसमोर मौनव्रत आंदोलन करणार आहेत. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर तिन्ही पक्षांचा एकत्रित असा उद्याचा पहिलाच बंद आहे. अन्नदात्यासाठी एक दिवसाचा उत्स्फूर्त बंद पाळा, असे आवाहन महाविकास आघाडीने जनतेला केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधितांवर सध्या आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते केंद्र व भाजपविरोधात संतप्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर बंद होत असल्याने त्याचा बऱ्यापैकी प्रभाव असेल, अशी शक्यता आहे.

भाजपचा विरोध, दुकानदारांना संरक्षण देणार : दरम्यान, महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला भाजपने विरोध केला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले, दडपशाही करून मुंबई बंद ठेवू देणार नाही. बंद झुगारून जे दुकानदार दुकाने सुरू ठेवतील त्यांना भाजप संरक्षण देईल.

शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा, बंदला नाही : व्यापारी संघटना
शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे, मात्र बंदला समर्थन नसल्याचे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने (एफआरटीडब्ल्यूए) स्पष्ट केले आहे. संघटनेचे प्रमुख प्रमुख वीरेन शहा म्हणाले, गेल्या १८ महिन्यांत लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. आता सणासुदीमुळे ग्राहकी वाढली असताना आमचा व्यापार अबाधित राहू द्यावा, असे आम्ही सरकारला आवाहन करत आहोत. दुसरीकडे, पुणे व्यापारी महासंघाने महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राखा यांनी ही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...