आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून विरोधकांचा छळ:संजय राऊत यांचा आरोप, ईडीचा गैरवापर करत लोकशाही खड्ड्यात घालण्याचे प्रयत्न

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत भाजपकडून विरोधकांचा छळ सुरू आहे. लोकशाही आणि देशाचे स्वातंत्र्य खड्ड्यात घालण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका आज संजय राऊत यांनी केली. नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज ईडीतर्फे चौकशी करण्यात येत आहे. त्यावरून राऊतांनी भाजपवर हल्ला चढवला.

दरम्यान, आज काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. हे काँग्रेसचे आंदोलन नसून हा त्या पक्षाचा संताप आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत भाजपकडून सर्वच विरोधी पक्षांची मुस्कटदाबी सुरू आहे. केंद्र सरकारविरोधात जे खरे बोलतात त्यांना खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे. आम्हीदेखील याचे बळी आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

आज अयोध्येला जाणार

शिवसेना नेते आदित्य ठाकरे 15 जूनरोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहे. त्याच्या तयारीसाठी संजय राऊत आज अयोध्येला जात आहेत. दौऱ्यात आदित्य ठाकरे शरयू नदीच्या तीरावर आरती करतील. रामल्लाचे दर्शन घेतील. हा राजकीय कार्यक्रम नाही. तर केवळ श्रद्धा असल्यामुळे आदित्य ठाकरे अयोध्येला जात आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

भुयारांच्या भावना मुख्यमंत्र्यांना कळवणार

राज्यसभेतील शिवसेनेच्या पराभवानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर आरोप केला होता. शिवसेनेला मतदान न केलेल्या अपक्ष आमदारांची नावे जाहीर करत राऊत यांनी देवेंद्र भुयार यांचेही नाव घेतले होते. त्यावर संजय राऊत चुकत आहेत. मी पहिल्या पसंतीचे मत संजय पवार व दुसऱ्या पसंतीचे मत संजय राऊत यांना दिल्याचा खुलासाही देवेंद्र भुयार यांनी केला होता. तसेच, शिवसेनेचे नियोजन चुकले. शिवसेनेचे उमेदवार मला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केला नाही. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे मी मतदान केले, असेही देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केले होते. त्यावर भुयार हे खरे बोलत असल्याचे मला वाटत आहे. त्यांच्या भावना आपण नक्कीच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू आणि मुख्यमंत्र्यांसोबतही त्यांची भेट घालून देवू, असे राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...