आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:'जितेंद्र आव्हाडांसमोर त्यांच्या सुरक्षारक्षांनी बेशुद्ध होईपर्यंत मारले', ठाण्यातील तरुणाचे आव्हाडांवर गंभीर आरोप

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जितेंद्र आव्हाडांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील एका तरुणाने मारहाणीचा आरोप केला आहे.  आव्हाडांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आव्हाडांनी ट्वीटरवरुन आपले मत मांडले आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, 'तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाबद्दल अशा खालच्या पातळीवर कोणी टीका केल्यावर तुम्ही काय कराल ? मी अशा गोष्टी खपवून घेणार नाही आणि त्यांना पाठिंबाही देणार नाही.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील लाइट बंद करुन दिवे लावण्याचे आवाहन देशातील जनतेला केले होते. मोदींच्या आवाहनावर जितेंद्र आव्हाडांनी सडकून टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर संबंधित तरुणाने आव्हाडांबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्या तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 5 एप्रिलच्या रात्री दोन साध्यावेशातील पोलिस घरी आले होते. त्यांनी पोलिस स्टेशनला बोलवलय असे सांगून त्या तरुणाला आव्हाडांच्या बंगल्यावर नेले. बंगल्यावर आव्हाड सुद्धा हजर होते. तिथे 15-20 जणांनी काढी तुटेपर्यंत पाठीवर, कंबरेवर, मांड्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच, यावेळी त्या तरुणाकडून माफी मागितल्याचा एक व्हिडिओदेखील काढण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आव्हाडांनी मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे- फडणवीस
आव्हाडांवर झालेल्या आरोपानंतर राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांनी मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. फडणवीसांनी ट्वीट करुन म्हटले की, 'एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे. '

बातम्या आणखी आहेत...