आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटोलेंच्या आरोपांना भुजबळांचा दुजोरा:म्हणाले - भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न, केंद्रीय यंत्रणांचा आमदारांवर दबाव

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून आमदारांना धमकीचे फोन येत आहेत, असा गंभीर आरोप आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही दुजोरा दिला. भाजप फोडाफोडीचे प्रयत्न करणारच. विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील​ आमदारांवर दबाव टाकण्याचे काम सुरू आहे, असा आरोप भुजबळ यांनी केला.

तपास यंत्रणांचा गैरवापर

नाना पटोलेंच्या आरोपांवर छगन भुजबळ म्हणाले, पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. त्यामुळे आमदारांना धमकावले जात असेल, तर त्यांच्यापर्यंत या बाबी नक्कीच गेल्या असतील. तसेही केंद्रीय पथके आता मविआ आमदारांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करत आहेत. त्यामुळे राज्यात अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याच काम सुरू आहे. राजस्थानमधील निवडणुकीतही भाजपने असेच राजकारण केले, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

अपक्षांचे मतदान महत्त्वाचे

भुजबळ म्हणाले, कोणत्याही निवडणुकीत छोट्या पक्षांचे तसेच अपक्ष आमदारांचे मतदान महत्त्वाचे ठरते. त्यासाठी त्यांना आपल्याकडे खेचण्याचा सर्वच पक्ष प्रयत्न करतात. त्यात तसे काही वाईट नाही. आमच्याकडूनही आमदारांना वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यासाठी तपास यंत्रणांचा वापर करणे चुकीचे आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

भुजबळ म्हणाले, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आज मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक झाली. आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळ्या करण्याच्या कामात काही त्रुटी आढळल्या आहेत. समिती आडनावावरून ओबीसींची नोंद करत असल्याचे आढळले आहे. मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेतली असून, आयोगाला कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अहवालात काही त्रुटी असल्यास परत माहिती मागवली जाईल. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचे राजकीय नुकसान होऊ देणार नाही, अशी भूमिका बैठकीत सर्वच नेत्यांनी मांडल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

मलिक, देशमुखांसाठी प्रयत्न

भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादीचे दोन नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करू देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेत असून आज किंवा सोमवारी याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ही दोन मते मिळाली नाहीत, तरी राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत फार अडचण येणार नाही. आमचे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...