आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी सुलतानी संकटाचा सामना करत होता. त्यातच अवकाळी पावसाने भर घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर अस्मानी संकटाने घाला घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
तसेच, नाफेडची कांदा खरेदी थंडावली आहे. त्यामुळे शेतकरी आणखी हवालदिल झाला आहे. सभागृहात चर्चा करून सरकारला यावर उत्तर देण्यास भाग पाडावे, अशी मागणीही दानवे यांनी विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे केली.
अंबादास दानवे म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील माळवाडी गाव शेतकऱ्याने विकायला काढला असून शेतमालाला भाव मिळत नाही. एकीकडे सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंगावत असताना अस्मानी संकट आता मोठा घाव करत आहे. यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून पडला आहे. शेतकरी छाती पेटून घेत असल्याची चित्रफीत पाहिली. नाफेडची खरेदी ही थंडावली असल्याने सरकारने या अस्मानी संकटावर चर्चा करावी.
अंबादास दानवे म्हणाले, मदतीची केवळ पोकळ घोषणा न करता सरकारने शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करावी. यापूर्वीही चार चार वेळेस राज्यात अतिवृष्टी झाली, मात्र शेतकऱ्यांना मदत वेळेवर पोहोचली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नी २८९ अनव्ये चर्चा घ्यायला पाहिजे होती. मात्र ती घेण्यात आली नाही. सरकार यावर काय मदत करणार आहे? याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली.
औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार
संभाजीनगर मध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे यांच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री 12 वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे, असेही दानवे म्हणाले. या आक्षेपार्ह बाबीची शासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल. आजच गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.