आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह सिंधुदुर्गात झाले आहेत. भाजप नेते नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण शाहांच्या हस्ते झाले. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर आहेत. दरम्यान अमित शाह यांनी नारायण राणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
अन्याविरोधात पाय रोवून उभा राहणारा नेता म्हणजे राणे - अमित शाह
'राणेंवर वारंवर अन्याय झाला त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास वळणावळणाचा आहे. जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा राणेंनी त्याचा प्रतिकार केला. अन्याविरोधात पाय रोवून उभा राहणारा नेता अशी राणेंची ओळख आहे. राणेंवर अन्याय होणार नाही याची ग्वाही मी देतो. राणेंसोबत न्यायच होईल याची पूर्ण खबरदारी भाजप घेईल. राणेंसारख्या नेत्यांना कसे सांभाळायचे हे भाजपला चांगल्या प्रकारे माहिती आहे. यशाची नवनवी शिखरे नारायण राणे पादाक्रांत करत आहेत.' असे म्हणत अमित शाहांनी नारायण राणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
शिवसेना ही आयत्या बिळावर नागोबा - नारायण राणे
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नारायण राणे म्हणाले की, ज्यावेळी आम्ही सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज तयार करण्यास सुरुवात केली. तेव्हाच विचार केला होता की, रुग्णालयाचे उद्घाटन अमित शाहांच्या हस्ते करु. असे डॉक्टर आणि कार्यकर्त्यांनी सुचवले होते.
मेडिकलच्या प्रकल्पात शिवसेनेने विरोध केला. त्यांनी जागा घेण्यास विरोध केला. विकासाला विरोध करणे म्हणजेच शिवसेना आहे. शिवसेना ही आयत्या बिळावर नागोबा आहे असे म्हणत नारायण राणेंनी निशाणा साधला आहे.
कोरोना काळात राज्यात चांगले काम झाले नाही - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, कोरोना काळात महाराष्ट्राची काय अवस्था झाली हे सांगण्याची आवश्यकता नाही. नुकताच संसदेत आर्थिक अहवाल मांडला. ज्या राज्यात कोविड काळात अत्यंत कमी काम झाले ते राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. देशातील सर्वात मोठा अर्थसंकल्प महाराष्ट्रातला असताना येथे चांगले काम झाले नाही. येथे सर्वात जास्त रुग्ण होते. पण आम्ही राजकारण केले नाही. आम्ही सरकारच्या पाठीशी उभे राहिलो. पण मला असे वाटते की, पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राची कोरोनात एवढी वाईट अवस्था का झाली याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे
अमित शाह यांच्या दौऱ्याविषयी माहिती देत असताना राणे यांनी 6 फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, 'या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सर्व सुख-सुविधा देण्यात आलेल्या आहेत. या अत्याधुनिक मेडीकल कॉलेजचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते होईल.' दरम्यान महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली होती.
राणे म्हणाले होते की, 'उद्धव ठाकरे सरकार चालवत असल्याचे कुठेही दिसत नाहीत. ते मातोश्रीमधून बाहेर पडत नाहीत, राज्याची आर्थिक, औद्योगिक स्थिती दयनीय झाली आहे. प्रगत महाराष्ट्र मागे जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत, त्यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार जावे आणि भाजपचे कर्तबगार सरकार यावे, ही माझी इच्छा आहे.' असा टोला नारायण राणेंनी लगावला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.