आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवणार आहेत, अशी शक्यता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र, कालच ही महत्त्वाची बैठक होऊनही मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित होऊ शकली नाही, अशी माहिती आता समोर येत आहे.
दिवाळीदरम्यान शिंदे म्हणाले होते...
“मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. एका मंत्र्याकडे अनेक खात्यांचा कार्यभार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार करून राज्यमंत्र्यांची नियुक्ती करणे आवश्यक झाले आहे. राज्यमंत्र्यांच्या नियुक्तीमुळे मंत्र्यांवरील कामाचा ताण थोडा कमी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे.”, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी दरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना केले होते. मात्र, आता एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर मौन पाळत आहेत.
विस्तारावर एकमत होईना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची दिल्लीत भेट घेतली. ही बैठक संपल्यानंतर दोन्ही नेत्यांनी शाह यांच्यासोबत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुमारे 30 मिनिटे चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे आता जानेवारी महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हे देखील पूर्णपणे निश्चित मानले जात नाही.
असंतोष पसरण्याची भीती
सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या 40 आमदारांपैकी बहुतांश आमदारांना मंत्री व्हायचे आहे. दुसरीकडे, बच्चू कडू यांच्यासारख्या अपक्ष आमदारांनाही मंत्री व्हायचे आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ आमदारही मंत्री होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामुळे ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, ते आमदार नाराज होऊ शकतात, असे मानले जात आहे. अशा नाराज आमदारांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या जास्त असू शकते. त्यामुळे सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो. या कारणास्तव आमदारांच्या नाराजीच्या भीतीने शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.