आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावरुन आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस अचानकपणे अयोध्येला पोहोचले त्यानंतर त्यांनी दिल्लीवारी केली. आता 16 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. विरोधकांच्या गोटात यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अमित शहा येणार असल्याचे बोलले जात असले तरी या दौऱ्याच्या पाठिमागे राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. अमित शहांच्या उपस्थितीत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे.
याआधीही मुंबईत
पंतप्रधान मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 17 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी अमित शहांनी कोल्हापूरला देखील भेट दिली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. पुणे पोटनिवडणुकीच्या दरम्यानही अमित शहा यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती.
'मिशन इलेक्शन'ला सुरुवात
मागील दौऱ्यात अमित शहा यांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले होते. शहा कोल्हापूरच्या सभेत म्हणाले होते, जेव्हा जेव्हा मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तेव्हा तेव्हा भाजपला यश मिळालेले आहे. असे म्हणत अमित शहा यांनी आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याची घोषणा कोल्हापूरात केली होती. यावेळी त्यांनी 'मिशन इलेक्शन'ला अप्रत्यक्षपणे सुरुवात करत असल्याचे सांगितले होते.
मंत्रिमंडळ विस्तार होणार?
अमित शहांच्या याआधीच्या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर ते काय भूमिका घेतील याकडे भाजप-शिवसेना नेत्यांचे लक्ष लागले होते. मात्र त्यावेळी त्यांनी काहीही भूमिका घेतली नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मात्र आता अमित शहा 16 एप्रिलला पुन्हा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.