आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मिशन मुंबई'साठी अमित शहा दाखल:लालबागच्या राजाचे घेतले दर्शन, भाजप कोअर कमिटीची आज बैठक; परिसरात तगडा बंदोबस्त

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी रात्री ते मुंबईत दाखल झालेत. त्यांनी आज लालबाग गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यानंतर ते भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यात ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजप आपली कंबर कसताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर शहांचा हा मुंबई दौरा मानला जातो.

लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांनी महालक्ष्मी देवीवरील एका पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, विनोद तावडे उपस्थित होते.

अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आशिष शेलार यांच्या मतदार संघातील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले.

महत्वाचे अपडेट्स

शिंदे-फडणवीस शहांच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहांना भेटण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. त्यासोबतच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील शहांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात शहा मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत.

विनोद तावडे लालबाग परिसरात

विनोद तावडे हे लालबाग परिसरात पोहोचले असून, ते तेथील आढावा घेत आहेत.

शहांसोबत शिंदे जाणार नाहीत

अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या दर्शनाला जाणार नाहीत. शिंदे सुरक्षेच्या कारणास्तव दर्शनाला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. शिंदेंही अचानक हे निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लालबाग परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त करण्यात आले आहे. लालबागकडे जाणारे रस्ते देखील पूर्णपणे रिकामे पाहायला मिळत आहे.

शहांचे मराठीतून ट्विट

अमित शाह सध्या सह्याद्री अतिथीगृहावर आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. तसेच थोड्याच वेळात अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रवाना होणार आहे. लालबाग परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. स्पेशल ब्रांचचे अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, सोबतच काही अधिकारी देखील तैनात करण्यात आले आहेत. मात्र लालबागला जाण्याआधी अमित शाह यांनी मराठीतून एक ट्विट केले आहे.

शेट्टी शहांच्या भेटीला

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी हे अमित शहांच्या भेटीला सह्याद्री या अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत.

शहांचा पहिला दौरा

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर अमित शहांचा हा पहिला दौरा आहे. मुंबई पालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यासाठी आता भाजपचा डोळा मुंबई पालिकेवर आहे. दरम्यान अमित शहा आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची देखील भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

शहा आज सकाळी लालबागच्या राजाचे आणि नंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणरायाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यातील गणपतीचे दर्शन घेतील आणि मेघदूत बंगल्यात भाजप प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करतील.

बैठकीत यांची उपस्थिती

शहा आज भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कोअर कमिटीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर वर्षा बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतील आणि मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करतील. त्यानंतर ते पवईला ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन करतील आणि नंतर दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

राज ठाकरेंना भेटणार

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्यावरून चांगलेच आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मविआ सरकार असताना ते नेहमी राज्य सरकारवर विशेषत: शिवसेनेवर हिंदुत्वावरून टिकास्त्र करायचे. त्यामुळे आता अमित शहा राज ठाकरे यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.

ठाकरेंची सत्ता उलथवण्याची रणनीती

29 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ती काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. शहांच्या मुंबई दौऱ्यानिमित्ताने मिशन मुंबईचा शुभारंभ होईल. अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या दर्शनाला येत आहेत. शहा 2017 मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले होते. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेची जबाबदारी शेलार यांच्यावर आहे. मुंबई पालिकेत 227 नगरसेवक आहेत. या वेळी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपने 'मिशन 200'ची घोषणा केली आहे. भाजपबरोबर शिंदे गट आणि मनसेची आघाडी होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...