आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Amit Shaha Mumbai Meeting | Amit Shaha And Raj Thackeray Meeting | Raj Thackeray And Amit Update | MNS And BJP Update | Mission Mumbai BJP

मिशन महाराष्ट्र:गृहमंत्री अमित शहांनी राज ठाकरेंची भेट टाळली; भाजप-मनसे युती होणार की नाही, पुन्हा चर्चेला उधाण

मुंबई | सलमान राजू शेखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा शहांचा पहिलाच दौरा होता. शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेतली आणि मुंबई महानगर पालिकेचा कानमंत्र देखील शहांना दिला.

दरम्यान अमित शहा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याच्या देखील चर्चा होत्या. मात्र, अमित शहा हे राज ठाकरे यांची भेट न घेताच दिल्लीकडे रवाना झाले. त्यामुळे आता भाजप-मनसे युती होणार की नाही, या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

गुढीपाडवा मेळाव्यापासून राज ठाकरेंची भूमिका भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला देखील त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना हिंदुत्व विसरल्याचे म्हणत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे तोंडभरून कौतुक केले होते. त्यानंतर राज ठाकरेंची भूमिका ही भाजपकडे असल्याची स्पष्टपणे दिसत होती.

भाजपचे मिशन मुंबई

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा फडणवीसांची सत्ता आली आहे. त्यामुळे आता भाजपने मुंबई जिंकण्याची तयारी केली आहे. आगामी मुंबई महापालिकेसाठी भाजपने कंबर कसली असून, मुंबई महानगर पालिकेत 150 नगरसेवक निवडून आणण्याचा दावा अमित शहांनी केला आहे. खरंतर गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई पालिकेवर शिवसेनेचाच झेंडा आहे. त्यात शिवसेनेची ताकद देखील मुंबईत मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपसमोर हे आव्हान आहे. त्यामुळे शिवसेनेची मते फोडण्यासाठी भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊ शकते.

भेट ठरलेलीच नव्हती

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि शहांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, "राज ठाकरे आणि अमित शहांची कोणत्याही प्रकारची भेट ठरलेली नव्हती." असे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले होते.

राज-फडणवीसांच्या भेटीगाठी

सत्तांतर झाल्यापासून राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात अनेकदा भेटीगाठी झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. बावनकुळेंनी राज ठाकरे यांच्यासोबत सुमारे तासभर चर्चा केली.

राज आज वर्षावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान 'वर्षा'वर जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचे ते दर्शन घेणार आहेत. शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर गणपती दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना देखील वर्षावर येण्याचे आमंत्रण दिले होते. आज वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज यांचे मिशन महाराष्ट्र

मुंबई पालिका आणि राज्यातील इतर पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळतेय. पक्षबांधणीसाठी ते महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून, त्यांच्या या दौऱ्याचा विदर्भातून श्रीगणेशा होणार आहे. 17 सप्टेंबरपासून राज ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात ते मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...