आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे सध्याच्या बायकोला कंटाळले आहेत. 'वाजले की बारा' फेम अमृतात खानविलकर हिच्या प्रेमात डॉ. अमोल कोल्हे पागल झाले आहेत. लवकरच ते पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन अमृता खानविलकरबरोबर लग्न करणार असल्याचे चित्रपटक्षेत्रात बोलले जात आहे.', अशा बातमीचा एक फोटो स्वत: खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या अमोल कोल्हे यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे.
अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या बातमीत म्हटले आहे की, 'अमृता खानविलकरदेखील तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट देऊन दोघे विवाहबद्ध होणार असल्याचे चित्रपटक्षेत्रात बोलले जात आहे.'
अमोल कोल्हेंनी शेअर केलेली बातमी
म्हणे, 'अमृता नावामुळे उपमुख्यमंत्री होऊ शकेन'
विशेष म्हणजे स्वत: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही या लग्नाला दुजोरा दिल्याचे बातमीत म्हटले आहे. 'या विवाहाचा माझ्या राजकीय कारकीर्दीवर काहीही परिणाम होणार नाही. उलट अमृताशी लग्न केल्यामुळे मी पण उपमुख्यमंत्री होऊ शकेन कारण अमृता हे नावच लकी आहे राजकारण्यांना', असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाल्याचे बातमीत म्हटले आहे.
अमोल कोल्हेंची मिश्कील टीप्पणी
अमोल कोल्हे यांनीच वृत्तपत्रामधील या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर मिश्कील टिप्पणीही अमोल कोल्हेंनी केली आहे. बातमीचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये अमोल कोल्हेंनी म्हटले आहे की, 'हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!'
पोस्टला अमृता खानविलकरचीही कमेंट
अमोल कोल्हे यांच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट केली आहे. 'हे काय आहे?', अशी कमेंट अमृता खानविलकरने केली आहे. काल एक एप्रिलरोजी अमोल कोल्हेंनी या बातमीची पोस्ट केली होती. त्यामुळे कुणीतरी चांगलेच एप्रिल फूल केले, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.