आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 74 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर बाॅम्बे हाॅस्पिटल, मुंबई येथे उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर टोपे कुटुंबीय हे शोक सागरात बुडाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोपे कुटुंबीयांचं सांत्वन करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.
'सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. या दुःखद प्रसंगी टोपे कुटुंबीयांचे सांत्वन करताना त्यांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो' असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'माझे दिवंगत सहकारी आणि मित्र कर्मयोगी अंकुशराव टोपे यांना शारदाताईंनी आयुष्यभर निष्ठेने साथ दिली. अंकुशराव टोपे यांच्या निधनानंतर त्या कुटुंबाच्या पाठीशी समर्थपणे उभ्या राहिल्या. त्यांचे सुपुत्र राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची आव्हानात्मक परिस्थिती यशस्वीतेने हाताळताना आपल्या मातोश्रींच्या आरोग्याचीही अखेरपर्यंत योग्य काळजी घेतली. माझे कुटुंबीय व पक्षाच्या वतीने दिवंगत शारदाताई अंकुशराव टोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!' असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच यामध्ये राजेश टोपेंच्या कामाचे कौतुकही त्यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.