आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया:मशाल भडकली आणि भगवा फडकला याचा मला आनंद

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. मशाल निशाणी घेऊन आम्ही लढलो. मशाल भडकली आणि भगवा फडकला याचा मला आनंद आहे, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्यावहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंची मशाल धगधगली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यानंतर ऋतुजा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जात भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे. या निवडणुकीत आपण विजय खेचून घेतला. येथून पुढच्या निवडणुकीतही आपण निवडणुका जिंकू. त्यामुळे मला भविष्यातील लढाईची चिंता राहिलेली नाही. या विजयाचे श्रेय शिवसैनिकांना आहेच. तसेच आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्ट पक्ष आणखी अनेक हितचिंतकांनी मेहनत घेतली. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो, असे ठाकरे म्हणाले.

जनता आमच्या सोबत

या निवडणुकीत नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत आमचे ज्यांनी चिन्ह गोठवले होते. हे सर्व ज्यांनी केले ते तर निवडणुकीच्या रिंगणात आजूबाजूला आले नाहीत. मात्र, त्यांचे करते-करवते होते. त्यांनी पक्षाच्या चिन्हावर अधिकृतपणे अर्ज भरला असता. तर नोटाला पडलेली मते त्यांनी पडली असती. निवडणूक चिन्ह महत्त्वाचे आहे. पण, चिन्ह कोणतेही असले तर जनता आमच्या सोबत आहे.

भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका

महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकावर ते म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ्या गोष्टी करत असते. गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले. आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागले आहे. प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे, असे ठाकरे म्हणाले.

या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 66 हजार 247 मतं मिळाली आहेत. त्यांच्यानंतर सर्वाधिक 12776 मते नोटाला मिळाली आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना केवळ 1506 मते मिळाली आहेत. विशेष अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाकडून लटके यांच्या विजयाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. येथे वाचा पुर्ण बातमी

अंधेरी जिंकल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

हा विजय माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांची पूर्ण राजकीय कारकीर्दीत जी जनसेवा केली, त्याचीच पोचपावती म्हणजे हा विजय आहे. मतदारांनी त्याचीच परतफेड केली आहे, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी सर्वांचे आभार मानले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झालाय. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय झालाय. ऋतुजा यांनी विजयानंतर अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...