आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दूध दरवाढ आंदोलन:दूध ओतून शेतकऱ्यांचा संताप; टँकर फोडले, मुंबईला बंदाेबस्तात दूध रवाना

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजच्या राज्य शासनाच्या बैठकीकडे दूध उत्पादकांचे लक्ष

राज्य सरकारने केलेल्या दूध दरवाढीचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. काेल्हापूर, मिरज, सांगली मराठवाडा यासह राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दूध दरवाढ आंदोलनात सहभागी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या हाेत्या. अनेक ठिकाणी दूधाचे टँकर अडवून त्यातील दूध रस्त्यांवर अाेतून देण्यात अाले. गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाना परिसरातील टिटवे येथे गोकुळ दूध संघाचा टेम्पो अडवून हजारो लिटर दूध कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतून दिले. सांगली जिल्ह्यातही एक टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडले. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून कडेकोट बंदोबस्तात गोकुळचे टँकर मुंबईकडे रवाना झाले.

राधानगरी तालुक्यातील टिटवे फाटा येथे दुधाचा टेम्पो अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दूध संघांची वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आले. संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे आंदोलनात सहभाग घेतला. दूधप्रश्नी सरकारला जाग आणण्यासाठी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एकदिवसीय दूध संकलन बंदचे आवाहन केले होते. उदगावच्या रामलिंग मंदिरात राजू शेट्टी यांनी शिवलिंगावर दुग्धाभिषेक केला.

मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर रस्त्यावर उतरू

केंद्र आणि राज्य सरकारने दूध दर आणि इतर मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढचा संग्राम मोठा असेल. यापुढे संघटना कोणताही इशारा न देता थेट रस्त्यावर उतरेल. त्या वेळी कोणतेही डिस्टन्स पाळणार नाही आणि कायदा व सुव्यवस्थेची बूज राखणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या स्टाइलने आंदोलन करेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

सांगली जिल्ह्यात सात लाख लिटर दूध संकलन ठप्प

बंगळरू राष्ट्रीय महामार्गावरील येलूर फाट्यावर पहाटे पाच वाजता मुंबईकडे जाणारा गोकुळ संघाचा २५ हजार लिटरचा टँकर अडवून दूध रस्त्यावर सोडले. मिरज तालुक्यात कसबेडिग्रज फाटा येथे राजारामबापू दूध संघाचा टँकर अडवून त्यातील दूधही रस्त्यावर अाेतण्यात आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी दूध संकलन न करता लोकांना वाटण्यात आले. आंदोलनामुळे जिल्ह्यातील दूध संघांनी संकलन बंद ठेवले होते. संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी दुधाची नासाडी करू नये, असे आवाहन केले होते, मात्र कार्यकर्त्यांकडून सुमारे ५० हजार लिटर दुधाची नासाडी करण्यात आली. दरम्यान, दूध बंद आंदोलनामुळे जिल्ह्यात सुमारे सात लाख लिटर दूध संकलन ठप्प झाले.

मराठवाड्यातही दूध आंदोलन पेटले : 

औरंगाबाद | मराठवाड्यात अनेक ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाची वाहने अडवली. अनेक ठिकाणी रस्त्यावर दूध सांडून देऊन सरकारचा निषेध केला. नांदेड जिल्ह्यातील धानोर येथे कार्यकर्त्यांनी बैलाला दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध केला. परभणीत शासकीय दूध डेअरी जवळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक करीत दूध रस्त्यावर ओतून दिले. गोविंदवाडी (जि.बीड) येथे ‘स्वाभिमानी’च्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी दूध ओतून देत आंदोलन केले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला.

गोकुळच्या सहा सेंटरवरून नेहमीपेक्षा दूध कमी संकलित

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनामुळे जिल्ह्यात सर्वाधिक दूध संकलन करणाऱ्या गोकुळ दूध संघावर परिणाम झाला. सकाळच्या सत्रात गोकुळच्या सहा सेंटरवरून नेहमीपेक्षा ३९ हजार २६१ लिटर दूध कमी संकलित झाले.

आजच्या राज्य शासनाच्या बैठकीकडे दूध उत्पादकांचे लक्ष

> राज्यात ४८ लाख दूध उत्पादक आहेत.

>  राज्याचे प्रतिदिन दूध उत्पादन १ कोटी १९ लाख लिटर एवढे आहे.

>  लॉकडाऊनमुळे ५२ लाख लिटर दूध अतिरिक्त

>  दर १७ ते २० रुपयांनी कोसळले पिशवीबंद दुधाच्या विक्रीत २० लाख लिटरने घट

राज्यात ५० हजार टन दूध पावडरचा साठा पडून

> दूध पावडरचा दर ३३० रुपयांवरून १६० रुपयांवरून