आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आणखी एक दिलासा!:मनी लाँड्रिंग प्रकरणी सहकारी कुंदन शिंदे यांना जामीन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंमलबजावणी संचालनालयामार्फत (इडी) चौकशी सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे यांना विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला.

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांचे पीए कुंदन शिंदेंना अटक केली होती. त्यानंतर आज शिंदे यांना मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिंदे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तरीही शिंदे मात्र, तुरुंगातच राहणार आहेत, कारण ते सीबीआयमार्फत चौकशी करत असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही आरोपी आहेत.

मनी लाॅंड्रिंग प्रकरणात अटक

अंमलबजावणी संचालनालयाने जून 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेल्या शिंदे यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात कथित भूमिकेसाठी अटक केली. विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी बुधवारी शिंदे यांचा जामीन अर्ज मंजूर केला. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये अनिल देशमुख आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा समावेश आहे.

देशमुख जामिनावर, सचिन वाझे आत

अधिवक्ता इंदरपाल सिंग यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जात शिंदे यांनी आपली अटक आणि कोठडीत सतत कारावास हा कायद्याच्या प्रक्रियेचा "घोर दुरुपयोग" असल्याचे म्हटले होते. तर ईडीने दावा केला की, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या भेटीदरम्यान देशमुख यांनी आपली शिंदे यांच्याशी ओळख करून दिली असे सचिन वाझेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

देशमुख यांनी गृहमंत्री असताना आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून सचिन वाझेच्या माध्यमातून 4.70 कोटी रुपये गोळा केल्याच्या आरोपासंबंधित ईडीचे हे प्रकरण आहे.

आरोपांवर देशमुखांचे खंडन

देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखालील एज्युकेशन ट्रस्ट नागपूरस्थित श्री साई शिक्षण संस्थेमार्फत या पैशांची गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. तर देशमुख यांनी आरोपांचे खंडन केले आणि एजन्सीचे संपूर्ण प्रकरण वाझे याने केलेल्या दुर्भावनापूर्ण विधानांवर आधारित असल्याचा दावा केला.

बातम्या आणखी आहेत...