आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात सत्तेचे बाजारीकरण पाहायला मिळते असून, सत्ता संघर्षासाठी होणारा अमर्याद खर्च ईडीला दिसत नाही काय, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. शिवाय, महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्याने हे सरकार वाचविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, राज्यातील लोकशाहीची बालुशाही केली गेली आहे. बालुशाही प्रमाणे ज्यांच्या वाट्याला जेवढी येईल तेवढा तुकडा खाल्ला जात आहे. हा सर्व खेळ काळा पैशाचा आणि बेहिशोबी पैशाचा आहे. राज्यात यापूर्वी देखील सत्तांतर झाली, फाटाफुटी झाली. पण, काळ्या पैशांचा सर्रास वापर आणि राजकारणाचे इतके विभक्त रूप यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही. सध्या सर्व बंडखोर आमदारांसाठी पूर्ण हॉटेलचे हॉटेल आरक्षित केले जात असून विमाने त्यांच्या वाहतुकीसाठी वापरले जात आहेत. पैशांचे व्यवहारांची उघड चर्चा होते आहे. अशा परिस्थितीत सीबीआय, इडी आणि आयकर विभाग यांना हे चित्र दिसत नाही का, असा सवाल त्यांनी केला.
खिशापासून राजकारण
गोटे म्हणाले की, एकीकडे शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण त्यांच्याबरोबरच असल्याचे दाखवत गुवाहाटीकडे पलायन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनापासून राजकारण होत नसून खिशापासून हे राजकारण केले जात आहे. नवीन राज्यकर्ते आल्यानंतर देखील सध्या राज्यात असलेल्या परिस्थिती आणि सामान्य माणसाच्या जीवनात फार बदल होणार नाही. सामान्य माणसाला या सरकार बदलण्याचा फायदा होईल.
इतिहासाची पुनरावृत्ती
राज्यातील परिस्थितीवर बोलताना अनिल गोटे यांनी जनता दलाच्या सरकारसमोर आलेल्या अशाच प्रकारच्या संकटाची आठवण करून दिली. पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे जनता पार्टी सरकारमध्ये मधू लिमये व राजनारायण यांनी आव्हान उभे केले होते. तेव्हा जनता पक्षाचे खासदार असलेले बापूसाहेब काळदाते यांच्याकडे मी मधू लिमये यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावर बापूसाहेब यांनी लिमये यांच्या भेटीनंतर अनेकांमध्ये परिवर्तन झाल्याचे सांगितले. पंतप्रधान देसाई यांच्या बाजूने जॉर्ज फर्नांडिस यांनी दोन तास भाषण केले. पण, लिमये यांची भेट घेतल्यानंतर देसाई यांच्या पाठिंब्यासाठी भाषण देणारे जॉर्ज फर्नांडिस यांच्यात बदल पाहायला मिळाला. आजची राजकीय स्थिती देखील तशीच दिसून येत आहे. शिवसेना पक्ष नेते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करणारे आमदार हे थेट गुवाहाटी येथे पोहोचत आहेत. ही परिस्थिती पाहता इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसते आहे असे गोटे यांनी सांगितले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.