आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धवसेनेचा आणखी एक नेता गोत्यात:ईडी चौकशीनंतर 6 महिन्यांनी अनिल परबांची दहा कोटींची संपत्ती जप्त

मुंबई/ रायगड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दापोलीतील साई रिसॉर्टसह ४७ गुंठे जमिनीवर टाच
  • सोमय्यांकडून अटकेचे संकेत

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व माजी मंत्री अनिल परब यांची दापोलीतील (जि. रत्नागिरी) साई रिसॉर्ट व ४२ गुंठे जमीन अशी १०.२० कोटींची संपत्ती ईडीने बुधवारी जप्त केली. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून परब यांनी हे रिसॉर्ट बांधल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यावरून आधी पर्यावरण विभागाने व नंतर ईडीने परबांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. सत्तांतराचे नाट्य सुरू असताना २१ ते २३ जूनदरम्यान तत्कालीन मंत्री परब यांची ईडीने ३ दिवस ९ ते १३ तासांपर्यंत चौकशीही केली होती. त्यानंतर ६ महिन्यांनी ईडीने जप्ती आणली. लवकरच परबांना अटक होण्याचे संकेत सोमय्यांनी दिले आहेत.

परब म्हणाले, माझा काय संबंध; संपत्तीचा शपथपत्रात उल्लेख नाही
प्रकरण काय? परब यांनी २०१७ मध्ये दापोलीत १ कोटीत १ जमीन खरेदी केली. तिथे २५ कोटींतून रिसॉर्ट उभारले. २०२० मध्ये केबल उद्योजक सदानंद परबला ही जागा १.१० कोटी रुपयांत विकल्याचे दाखवले. यात मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ईडीला संशय आहे. मात्र परब यांनी आरोप फेटाळले. त्यांच्या निवडणूक शपथपत्रातही या संपत्तीचा उल्लेख नाही.

मंत्री असताना बंगल्यांवर छापे
मंत्री असतानाही परब यांच्या खासगी व शासकीय बंगल्यांवर ईडीने छापे टाकले होते. तब्बल १२ तास पथक ठाण मांडून होते. त्याच वेळी परब यांना अटक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

रिसॉर्ट पाडण्याचे टेंडरही निघाले
अनधिकृत ठरवलेले रिसॉर्ट पाडण्यासाठी चिपळूणच्या बांधकाम विभागाने सप्टेंबर महिन्यात निविदा काढल्या होत्या. १४ नोव्हेंबरपर्यंत त्यासाठी मुदत दिली होती. सोमय्यांनी ही माहिती ट्वीट केली होती.

^साई रिसॉर्टशी माझा संबंध नसल्याचे मी पूर्वीपासून सांगतोय. ईडीने जप्त केलेली संपत्ती सदानंद परब यांची आहे. माझी बदनामी केली जात आहे. आता मी कोर्टात जाऊन न्यायाची मागणी करेन. - अनिल परब, माजी मंत्री

^अखेर अनिल परब यांचा हिशेब होत आहे. आता तर ईडीने कारवाई सुरू केली आहे. परब यांची साई रिसॉर्टची संपत्ती जप्त होत आहे. लवकरच अनिल परबही...! - किरीट सोमय्या, तक्रारदार

बातम्या आणखी आहेत...