आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेवर भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार पोलिसांत दिली आणि या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. याच महिलेकडून असाच प्रयत्न मनसे नेते मनीष धुरी यांच्यासोबतही घडला असल्याचे उघड झाले. हे प्रकरण ताजे असतानाच आता रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे.
रेणू शर्मा हिने जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नामक तरुणालाही असेच छळले होते, हे पोलिसांत दिलेल्या कागदपत्रांपैकी काही हाती लागलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. सोशल मीडियावरून ओळख झाली. त्यानंतर मैत्री, त्यानंतर भेटीगाठी, हॉटेलिंग आणि बरेच काही घडले. हे जवळपास दोन वर्षे चालले. त्यानंतर मात्र या महिलेने रिझवान कुरेशीविरोधात आंबोली पोलिस ठाण्यात विनयभंगाची व बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा ही महिला सोशल मीडियावरील स्टार मेकर या चायनीज अॅपवर गायनाचे काम करत अनेकांच्या संपर्कात असल्याचेही समोर आले आहे. रिझवान कुरेशीसोबत ती मे २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत संपर्कात होती. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार केली. पैशांची मागणी किंवा हनी ट्रॅपसारखेच रिझवान कुरेशी प्रकरण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रिझवान यांच्यासोबत जे घडले तोच प्रकार हेगडे, धुरी आणि आता मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतही घडत नाही ना, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो.
रेणू एकाच वेळी चौघांच्या संपर्कात कशी ? : मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेते कृष्णा हेगडे, मनसे नेते मनीष धुरी आणि आता हे रिझवान कुरेशी इतक्या लोकांच्या ही महिला एकाच वेळी संपर्कात कशी काय आली, यामागचे नेमके गौडबंगाल काय, असे प्रश्न उपस्थित केले जात असून या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. दुसरीकडे या महिलेने मुंडेंवर केलेल्या आरोपात काही तथ्य आहे की मुंडेंनी खुलासा केल्याप्रमाणे हा फक्त ब्लॅकमेलिंगचेच प्रकरण आहे, अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
दिव्य मराठी एक्सप्लेनर / आमदारकी रद्द होण्याचा धोका नाही : उल्हास बापट, घटनातज्ज्ञ
धनंजय मुुंडे यांनी दिलेल्या लिव्ह इन व दोन अपत्यांच्या कबुलीमुळे त्यांच्या आमदारकीस धोका निर्माण झाल्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. यासंदर्भात कायदा आणि निवडणूक आयोगासमोरचे पर्याय या दृष्टिकोनातून घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिलेली माहिती
खोटे शपथपत्र सादर केल्याबद्दल निवडणूक आयोग काय कारवाई करू शकते ?
उल्हास बापट : निवडणूक आयाेगाच्या प्रतिज्ञापत्रात केवळ लग्न झाले का आणि मुले किती याबाबत माहिती विचारली जाते. त्याप्रमाणे कायदेशीर लग्नाबाबत मुंडे यांनी माहिती दिलेली आहे.
लिव्ह इन संबंधातून झालेल्या अपत्यांची माहिती दडवल्याबद्दल आयोग कारवाई शकतो?
उल्हास बापट : मंत्री धनंजय मुंडे यांनी दुसरे लग्न केल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही तसेच संबंधित दुसऱ्या महिलेने त्यांच्याविराेधात काेणती तक्रार दिलेली नाही. मुलांचा सांभाळ ते करत असून त्यांना त्यांचे नाव वापरण्याची संमती दिलेली आहे. त्यामुळे त्याबाबत काेणती तक्रार नाही.
मुंडेंची आमदारकी रद्द होण्याची कितपत शक्यता आहे ?
उल्हास बापट : कायदेशीरदृष्ट्या आमदारकी रद्द हाेण्याचा धाेका नाही. अत्याचार प्रकरणात त्यांना राजकारणात किंमत माेजावी लागू शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.