आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटी-गाठी:​​​​​​​वाझे सस्पेंड होताच पवार-ठाकरे यांच्यात चर्चा; राष्ट्रवादीत खलबते, निवडक वरिष्ठ मंत्र्यांसोबत पवारांची आणखी एक बैठक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनिल देशमुखांशिवाय दुसरी बैठक;गृहमंत्री बदलणार नाही : जयंत पाटील

अँटिलिया स्फोटके प्रकरणात एनआयएच्या कोठडीत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर सोमवारी निलंबित करण्यात आले. वाझे प्रकरणामुळेे आता गृहमंत्री अनिल देशमुखही अडचणीत आले असून सोमवारी सायंकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची दोन-तीन तास खलबते चालली. तत्पूर्वी, शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

बारामती येथे रविवारी बोलताना वाझे यांची अटक हा ‘स्थानिक’ मुद्दा असल्याचे सांगून भाष्य करण्यास शरद पवार यांनी नकार दिला होता. मात्र सोमवारी त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत गृहमंत्री देशमुख यांची ‘परीक्षा’ घेतली. मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्याच्या नावाखाली घेण्यात आलेल्या या बैठकीनंतर पुन्हा शरद पवार यांनी वाझे प्रकरणावर निवडक मंत्र्यांसोबत स्वतंत्र चर्चा केली. विशेष म्हणजे, या स्वतंत्र बैठकीस गृहमंत्री देशमुख अनुपस्थित होते, हे विशेष त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले. राष्ट्रवादीची बैठक सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या.

अनिल देशमुखांशिवाय दुसरी बैठक;गृहमंत्री बदलणार नाही : जयंत पाटील
मुंबई | यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्या डाव्या बाजूला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित होते. अर्थसंकल्पात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या खात्यांच्या वाट्याला काय आले, याचा अाढावा घेण्यात आला. बैठकीत काय खलबते झाली हे कळू नये म्हणून मंत्र्यांच्या खासगी सचिवांनाही बाहेर ठेवण्यात आले होते. या वेळी आघाडी सरकारमधील पक्षाच्या भूमिकांवर चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे प्रकरणाची इत्थंभूत माहिती शरद पवारांच्या कानावर घातली. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख चांगले काम करत आहेत. राज्याचे गृहमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाहेर याबाबत कितीही वावड्या उठत असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशी कुठलीही चर्चा सुरू नाही. त्यामुळे गृहमंत्रिपदी तेच कायम राहतील, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

वाझे प्रकरणानंतर भाजप घेणार आघाडी सरकारची दुसरी विकेट ?
वनमंत्री संजय राठोड यांच्यापाठोपाठ आघाडी सरकारची दुसरी विकेट पडणार असल्याची चर्चा आहे. राठोडनंतर वाझेंनिमित्ताने भाजपने गृहमंत्रालयाच्या कारभारावर हल्ला चढवल्याने राष्ट्रवादी अडचणीत आली असून मंत्रिमंडळात खांदेपालट होईल, अशी चर्चा आहे.
बैठकीनंतर सभागृहातून बाहेर पडताना शरद पवार.

पवारांची मंत्र्यांसाेबत चर्चा
अाढावा बैठक झाल्यानंतर दुसरी बैठक निवडक मंत्र्यांसोबत पार पडली. या वेळी अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड अशा निवडक मंत्र्यांसोबत पवार यांनी चर्चा केली. मात्र या बैठकीत गृहमंत्री देशमुख नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.

पवार-ठाकरे भेटीत वाझेंवर चर्चा ?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ही नेहमीचीच भेट होती, असा दावा पक्षाने केला. मात्र वाझे प्रकरणात संशयाची सुई शिवसेनेतील नेत्यांकडे जात असल्याने याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडून पवारांनी वाझे प्रकरणाशी संबंधित माहिती जाणून घेतली.

पीपीई किट घातलेले वाझेच होते का? पडताळणी सुरू
अँिटलिया बंगल्याबाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची मुंबई पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये पीपीई किट घालून जाणारी व्यक्ती दिसते ते वाझे असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्याची पडताळणी केली जात आहे.

सचिन वाझे निलंबित, रियाझ काझीची तिसऱ्यांदा चौकशी
अँटिलियाप्रकरणी एनआयए कोठडीत रात्र घालवल्यानंतर सोमवारी वाझे यांना निलंबित करण्यात आले. वाझे यांचे सहकारी रियाझ काझी यांना एनआयएने तिसऱ्यांदा चौकशीसाठी पाचारण केले. काझी आणि वझे यांची आमने-सामने चाैकशी होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...