आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीची न्यायालयात माहिती:बार मालकांकडून उकळलेले 4.7 कोटी वाझेने अनिल देशमुखांच्या पीएला दिले; देशमुखांचे पीए संजीव पलांडे, कुंदन शिंदे यांना अटक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
​​​​​​​प्रसारमाध्यमांचा ससेमिरा चुकवताना कुंदन शिंदे. त्याला व संजीव पलांडेला शनिवारी पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. - Divya Marathi
​​​​​​​प्रसारमाध्यमांचा ससेमिरा चुकवताना कुंदन शिंदे. त्याला व संजीव पलांडेला शनिवारी पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले.
  • सचिन वाझे बार मालकांना म्हणाला : हा पैसा नंबर वनला जाईल

राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढत असून शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात धक्कादायक माहिती दिली. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने मंुबईतील ४ बार मालकांकडून ४ कोटी ७० लाख रुपये गोळा केले होते. ही सर्व रक्कम त्याने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्या हातात सोपवली होती, अशी माहिती ईडीने न्यायालयास दिली. देशमुखांचे खासगी सचिव संजीव पलांडे (५१) आणि स्वीय सहायक कुंदन शिंदे (४५) यांना शनिवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यांना शनिवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले त्या वेळी ईडीने ही माहिती दिली.

वाझे त्या वेळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचा प्रमुख होता. ईडीने त्याची चौकशी केली त्या वेळी त्याने अनेक गौप्यस्फोट केले. अनेक पोलिस तपासांमध्ये आपल्याला थेट अनिल देशमुख यांच्याकडून सूचना मिळत होत्या असे त्याने सांगितले. वसूल केलेले हे पैसे ‘नंबर वन’ आणि मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा व सामाजिक सुरक्षा शाखेला जाणार आहेत, असेही वाझे याने बार मालकांना सांगितले होते, असे ईडीने न्यायालयात सांगितले. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांना ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांना १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर देशमुख यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावले आहे.

देशमुख यांचे वकील ईडी कार्यालयात
चौकशीपूर्वी या गुन्ह्याच्या संदर्भात कोणतीही कागदपत्रे अथवा माहिती ईडीने देशमुख यांची दिलेली नाही. त्यामुळे ईडीला पत्र दिले असून केसशी संबंधित कागदपत्रे मागवली आहेत. हे दस्तऐवज उपलब्ध झाल्यानंतर त्यानुसार उत्तर दिले जाईल, असे देशमुख यांचे वकील जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पलांडे,शिंदेची ९ तास चौकशी
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून देशमुख तसेच त्यांच्या स्वीय सहायकांची मनी लाँडरिंग कायद्यानुसार चौकशी सुरू आहे. शुक्रवारी तब्बल ९ तास कसून चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली होती.

देशमुखांना मंगळवारी पाचारण
ईडीने देशमुख यांनाही समन्स बजावले होते, परंतु शनिवारी ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीकडे कागदपत्रांची मागणी करून नवी तारीखही मागून घेतली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी, सकाळी ११ वाजता देशमुख यांच्या वतीने त्यांचे वकील जयंत पाटील हे बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात गेले होते.

डिसेंबर २० ते फेब्रुवारी २१ चे कलेक्शन
ईडीच्या चौकशीवेळी वाझेचे गौप्यस्फोट : माजी पोलिस अायुक्त परमबीरसिंग यांच्या पत्रानंतर अँटिलिया प्रकरणात अडकलेल्या सचिन वाझेनेही ईडीला पत्र लिहिले होते. त्यानंतर त्याचीही चौकशी करण्यात आली. या चौकशीत वाझेने तपशीलवार माहिती दिली. तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीत त्याला बार आणि रेस्टॉरंट मालकांची यादी देण्यात आली आणि प्रत्येक बार मालकाकडून दरमहा ३ लाख रुपये वसूल करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार डिसेंबर २० ते फेब्रुवारी २१ या तीन महिन्यात विविध बार मालकांकडून त्याने सुमारे ४ कोटी ७० लाख रुपये वसूल केले. हे पैसे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दोन हप्त्यात गृहमंत्र्यांचे स्वीय सहायक कंुदन संभाजी शिंदे याला दिले. हे पैसे त्याच्याकडे देण्यात यावे असे गृहमंत्र्यांनीच सांगितले होते,असा जबाब वाझेने ईडीच्या चौकशीवेळी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...