आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेटरबॉम्ब:‘मातोश्री’चा परिवहनमंत्री अनिल परब यांना पाठिंबा, सध्या राजीनामा होणे नाही; शिवसेनेची प्रतिमा मलिन होत असल्याची ‘उद्धव’ यांना चिंता

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या मागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खंबीर उभे राहिले आहेत

‘एनआयए’च्या कोठडीत असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्या लेटर बॉम्बप्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या मागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खंबीर उभे राहिले असून प्रकरण कुठल्याही थराला जावो, मात्र अनिल परब यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार नसल्याचे शिवसेनेतील खास सूत्रांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या सरकारला दोन वर्षे होण्यापूर्वीच दोन बड्या मंत्र्यांचे राजीनामे झाले आहेत. आता अॅड. परब यांच्या राजीनाम्याची विरोधी पक्षाने मागणी लावून धरली आहे. मात्र, या वेळी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खंबीर भूमिका घेतली असून अॅड. अनिल परब यांचा राजीनामा होणे नाही, असे शिवसेनेतील एका नेत्याने सांगितले. मुळात परब यांच्यावर केलेले आरोप हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरचाच विरोधकांचा हल्ला आहे. कारण सध्या अनिल परब हे सध्या उद्धव यांच्या सर्वात जवळचे आहेत.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी परब यांना ‘तू लढ.. तू काही झाले तरी राजीनामा द्यायचा नाही.. तू दिला तरी मी तो मंजूर करणार नाही..’ असे सांगितल्याचे समजते. स्व. बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत आहेत. परब यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगण्यासाठी बाळासाहेबांची शपथ घेतल्याने सैनिकांमध्ये सकारात्मक संदेश गेल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. परब यांच्यावरच्या आरोपांचा फेब्रुवारीत होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला विशेष लाभ होणार नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी दिव्य मराठीकडे केला.

वाझे प्रकरणात मंत्र्यावर मोक्का लावा : पाटील
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटित गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून संबंधितांविरुद्ध मोक्का अन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, परमबीर सिंग, सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्यांकडून जी माहिती समोर येत आहे, ती अत्यंत धक्कादायक आहे. या बाबतचे सबळ पुरावे सादर झाले तर या प्रकरणी संबंधित व्यक्तींच्या विरोधात संघटित गुन्हेगारीच्या (मोक्का) कलमाखाली गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला जो न्याय लावला जातो तोच न्याय या प्रकरणात नामोल्लेख झालेल्यांना लावावा. सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडण्याऐवजी मंत्री अनिल परब यांनी एनआयए, सीबीआय समोर जाऊन स्पष्टीकरण द्यावे,असेही पाटील म्हणाले. कोरोना स्थिती हाताळण्यात आघाडी सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. लसीकरण कार्यक्रमाचा पूर्णतः फज्जा उडाल्याचेही ते म्हणाले.

भाजप, मातोश्रीतील अंतर वाढले
परब यांच्यासंदर्भात भाजपने सचिन वाझेच्या लेटरमार्फत जो डाव खेळला आहे त्यामुळे मातोश्री आणि भाजप यांच्यात अंतर आणखी वाढल्याचे शिवसैनिक मानत आहेत. १०५ आमदार असूनही सत्ता स्थापन करता येत नाही याची खंत भाजपला आहे. त्यातून भाजपकडून सरकारविरोधात कारस्थाने रचली जात असल्याचे मुंबईतले शिवसैनिक सांगतात. एकूण, अनिल परबप्रकरणी भाजपचा डाव अयशस्वी करण्याचा शिवसेना नेतृत्वाने निर्णय घेतला असल्याचे समजते.

केवळ राजकीय लाभासाठी पत्र
निलंबित एपीआय सचिन वाझे याचे पत्र एनआयए न्यायालयाने नाकारले होते. आरोपीस असे थेट पत्र न्यायालयास देता नाही, असे त्यास बुधवारी न्यायालयाने बजावले होते. त्यानंतर हे पत्र राजकीय लाभासाठी माध्यमांना ठरवून पुरवले गेले, असा शिवसेना नेत्यांचा दावा आहे. बाळासाहेबांची शपथ घेतल्याने शिवसैनिकांचा दुणावला विश्वास

बातम्या आणखी आहेत...