आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनी (रविवार, ६ डिसेंबर ) तमाम अनुयायांनी मुंबईत दादरस्थित चैत्यभूमी स्मारक येथे येऊ नये आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने एकमताने करण्यात आले आहे. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा या वर्षी रद्द करण्यात आल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस उपआयुक्त प्रणय अशोक, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, गजानन बेल्लाळे, स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी ी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी महानगरपालिका प्रशासनातर्फे माहिती देताना सहायक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, प्रतिवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध नागरी सेवा-सुविधा पुरवल्या जातात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्याने एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. हा धोका लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा गांभीर्याने पालन करण्याचा व दुःखाचा दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरून अनुयायांनी अभिवादन करावे, अशी नम्र विनंती आहे, असे दिघावकर यांनी नमूद केले. अनुयायांना येण्यास निर्बंध असले तरी महापरिनिर्वाण दिनाची प्रतिवर्षीप्रमाणे शासकीय पद्धतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असे सांगून दिघावकर म्हणाले की, चैत्यभूमी वास्तू तसेच अशोकस्तंभ, तोरणा प्रवेशद्वार यांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. चैत्यभूमी, अशोकस्तंभ, भीमज्योती आदी सर्व ठिकाणी पुष्प-सजावट करण्यात येईल. सोबतच चैत्यभूमी येथे महत्त्वाच्या व्यक्तींकरिता नियंत्रण कक्ष उभारणी करून चैत्यभूमी येथे १ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी आणि जल सुरक्षा रक्षकदेखील तैनात केले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे देण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा यंदा नसतील. उर्वरित तयारी योग्यरीत्या आणि विहित वेळेत पूर्ण केली जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.