आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर आणि शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार आज औरंगाबादेत दाखल झाले. यावेळी शिंदे गटात जाण्याबाबत मी उद्या जालन्यात भूमिका स्पष्ट करेल, असे अर्जून खोतकर यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 जुलै रोजी सिल्लोडच्या दौऱ्यावर आहेत. याचवेळी अर्जुन खोतकर अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.
खोतकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत अब्दुल सत्तार म्हणाले, खोतकर यांनी आमच्याशी चर्चा करून शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला आहे. खोतकर यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जास्त लांबवू नये, असा सल्लाही त्यांनी खोतकर यांना दिला.
खोतकर हे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून होते. तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे अर्जुन खोतकर यांना शिंदे गटात सामावून घेण्यासाठी मध्यस्ती करत आहेत. त्यांनी मनधरणी करण्यासाठी त्यांनी आज दिल्ली गाठली होती. दरम्यान, दोघेही नुकतेच औरंगाबादेत दाखल झाले आहेत.
ठाकरेंशी बोलून निर्णय - खोतकर
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी अर्जुन खोतकर, श्रीकांत शिंदे आणि अब्दुल सत्तार यांची बैठक झाली. माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची वेळही जाहीर केली. खोतकर हे 31 जुलै रोजी शिंदे गटात येणार असल्याचा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलून निर्णय घेईन, असे खोतकर यांनी म्हटले आहे. तसेच, अद्याप ठाकरेंशी चर्चा झाली नाही, असे त्यांनी औरंगाबादेत स्पष्ट केले.
अब्दुल सत्तार म्हणाले की, ज्यावेळी शिवसेनेचे मंत्रिमंडळ होते तेव्हा गतिमान निर्णय होत नव्हते. शिंदे सरकारमध्ये जलद निर्णय होत आहेत. मंत्रिमंडळासाठी मी दिल्लीत आलो नाही. ते मुंबईतही ठरवता येईल येथे त्याचा संबंध काय? मी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या लॉबीसाठी आलो नाही. अर्जुनराव यांचा राजकारणाचा अंतीम निर्णय त्यांनी घेतला. पण औपचारिक घोषणा स्वतःच्या मतदारसंघात व्हावी अशी त्यांची ईच्छा आहे, त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा जास्त लांबवू नये. मी अर्जुनरावचा मित्र आहे, त्यांची वकिली मी करणारच आहे.
कोण आहेत अर्जुन खोतकर?
जालना हा मराठवाड्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यात अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे उपनेते आहेत. मराठवाड्यातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व, माजी मंत्री अशी अर्जुन खोतकर यांची ओळख आहे. वयाच्या 22 व्या वर्षीच ते 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते. खोतकर यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधील त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे एक आड एक विधानसभेला पराभूत होण्याची खोतकरांची परंपरा कायम राहिली आहे.
अर्जुन खोतकर यांच्या पराभव-विजयाचा इतिहास
1990 – विजय
1995 – विजय
1999 – पराभव
2004 – विजय
2009 – पराभव
2014 – विजय
2019 – पराभव
खोतकर-दानवे वाद
अर्जुन खोतकर यांनी कायमच आयुष्यभर शिवसेनेतच राहण्याचा दावा केला आहे. पण, आता खोतकर शिंदे गटाच्या वाटेवर जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अर्जुन खोतकर-एकनाथ शिंदे यांची दिल्लीत गुप्त भेट झाल्याचाही एक व्हिडिओ समोर आला होता. भाजपसोबत गेलेल्या शिंदे यांना पाठिंबा द्यायचा झाल्यास रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध होत असलेल्या संघर्षाचं काय, असा प्रश्न खोतकर यांच्यासमोर निर्माण झाला होता. खोतकर आणि दानवे यांच्यामध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा संघर्ष झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये समेट घडवून आणत असल्याची माहिती आहे. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी खोतकर हे शिंदे गटात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र, अद्याप त्यांनी शिंदे गटातील प्रवेशाविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.