आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पोलिस, महानगरपालिका, रेल्वे, वाहतूक पोलिस यांची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांचे सुमारे तीन हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, ५ लाख अनुयायांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईत चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकरिता महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वेस्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, व्हीआयपी कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्यसेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिका उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांनी ही माहिती दिली. याव्यतिरिक्त आपतकालीन परिस्थितीत तात्पुरत्य्या निवाऱ्याची सोय म्हणून महानगरपालिकेच्या ६ शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच चौपाटीवर सुरक्षा रक्षकासह बोटीची परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे बीएमसी जिमखाना, शिवाजी पार्क येथे चैत्यभूमीवर येणाऱ्या पाच लाख अनुयायांसाठी विनामूल्य जेवण व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
महापालिकेकडून चौपाटीवर सुरक्षा रक्षकासह बोटीची व्यवस्था रेल्वेच्या १४ विशेष गाड्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून १४ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तीन विशेष गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ६ विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, २ विशेष गाड्या कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईदरम्यान दोन विशेष ट्रेन आणि अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान एक विशेष ट्रेन धावणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईत बेस्टतर्फे ४०० जादा गाड्या बेस्टचे महाव्यवस्थापक आणि प्रशासक लोकेश चंद्र यांनी सांगितले की, बेस्टतर्फे भाविकांसाठी ४०० जादा दिव्यांची व ५० जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दादर रेल्वेस्थानकावरील पूर्व आणि पश्चिम भाग जोडणारा मोठा पूल आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ६ पासून रहदारी रेल्वे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव सोमवारी मध्यरात्रीपासून बंद केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.