आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. कधीकाळीचे कट्टर विरोधक एकत्र आले असून अनेक वर्षांचे मित्र, सोबती आता एकमेकांचे तोंडही पाहायला तयार नाही. ढवळून निघालेल्या राजकीय परिस्थितीवर प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी उपरोधिक काव्य रचत टीका केली आहे.
'तू चमचा व्हायचा इचार कवा एकदा सोडतूस ? महाराजांचा मावळा हो.. बाकी समदं फडतूस'!, अशाप्रकारची रचना अरविंद जगताप यांनी केली आहे. गेल्या 2 दिवसात अरविंद जगताप यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर चर्चिली जात आहे. समीक्षकांकडून ती मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असून य पोस्टवर लाईक्स आणि कमेंटसा अक्षरशः पाऊस पडत आहे. 'फडतूस' आणि 'काडतूस' या शब्दांभोवती फिरणाऱ्या राजकारणावर जगताप यांनी निशाणा साधला आहे.
फडतूस उल्लेख
राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना-भाजप हा एक गट आणि दुसरा महाविकास आघाडी असे गट पडले आहेत. महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस या जोडगोळीविरुद्ध वज्रमूठ बांधली आहे. नुकत्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मविआच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फडतूस असा उल्लेख केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील याला प्रत्युत्तर दिले होते. यावरुन राजकारण चांगलेच तापले होते.
झुकेंगा नही साला
उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत फडतूस गृहमंत्री अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. ठाकरेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''उद्धव ठाकरे मला फडतूस गृहमंत्री म्हणाले, उद्धव ठाकरे फडतूस नही काडतूस हू मै झुकेंगा नही साला घुसेंगा''.
ही आहे जगताप यांची व्हायरल कविता
'भावा
तू कशाला चिडतूस ?
आन कुणामुळं रडतूस ?
बेरोजगार आसून ऊडतूस,
महागाईला कवा भिडतूस ?
नेत्याचं धुणं रोज काढतूस
बापाचं पांग कवा फेडतूस ?
तुझ्या पोटापाण्याचं सोडतूस
आन नकू त्या वादात पडतूस !
तू चमचा व्हायचा इचार कवा एकदा सोडतूस ? महाराजांचा मावळा हो.. बाकी समदं फडतूस'!
-अरविंद जगताप
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.