आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे-मेमनचा दूरदूरपर्यंत संबंध नाही:अरविंद सावंतांचे भाजपला उत्तर; चौकशी करून कारवाई करण्याचे दिले आव्हान

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उगाच शेपूट आपटवत बसू नका. उद्धव ठाकरेंचा याकूब मेमनशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, अशा तिखट शब्दांमध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला.मेमनचे उदात्तीकरण करण्यासाठी मृतदेह दिला का? याचे उत्तर भाजपने द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याचे समोर आले. यावरून भाजप आक्रमक झाली असून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. तर दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी लगेच हालचाल करत या कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या आहेत.

'तो' व्यक्ती अटकेत

भाजपला उत्तर देताना सावंत म्हणाले, यांना उद्धव आणि आदित्य सारखे सारखे दिसत असतात. 2015 मध्ये तथाकथित हिंदुत्ववादी सरकारने याकूब मेमनला फाशी दिली. मध्यंतरी कोणीतरी त्याठिकाणी उदात्तीकरण करत होते. त्या जागा विकत घेण्याचा प्रयत्न झाला. त्या व्यक्तीला अटकही करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

लादेनचे प्रेत दिले नव्हते

सावंत म्हणाले, ओसामा बिन लादेनला अमेरिकेने घरात घुसून मारले. त्यावेळी त्याच्या प्रेताचे कोणी थडगे बांधू नये. उदात्तीकरण करू नये म्हणून त्यांनी त्या प्रेताच्या गळ्यात धोंडा बांधून ते समुद्रात टाकून दिले. तसेच ज्यावेळी फडणवीस राज्यात आणि मोदी केंद्रात होते, तर त्यांनी का प्रेत दिले? याचे उत्तर द्या. बडा कबर हे खासगी आहे. त्याठिकाणी काय घडतेय याचा निर्णय राज्य सरकार घेत नाही. मात्र, उठसूट ठाकरे सरकारवर टीका करायची असते.

प्रकरणाची चौकशी करा

सावंत म्हणाले, देशामध्ये एवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. मात्र, सातत्याने या प्रश्नांवरून सामान्य जनतेचे लक्ष भटकवण्याचा असा अश्लाघ्य प्रयत्न होतो आहे. याकूबचे उदात्तीकरण शिवसेना करत असल्याचा आरोप तुम्ही करत आहात, तर आम्ही मागणी करतो या प्रकरणाची चौकशी करा. करा जी काही कारवाई करायची आहे. उगाच शेपटं आपटवत बसायची नाही.

कसाबचा मृतदेह दिला होता का?

शिवसेना आणि ठाकरे सरकार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा याकूब मेमनशी दुरान्वये संबंध नाही, असे सावंतांनी ठणकावून सांगितले. तुम्हीच उत्तर द्या की तुमचे सरकार होते. तर उदात्तीकरण करण्यास याकूबचा मृतदेह का दिला, कसाबचा मृतदेह दिला होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. ज्याप्रकारे शिवसेनेला झोडण्याचा प्रयत्न होत आहे. त्याची मी निंदा करतो. उचलली जीभ लावली टाळ्याला आणि आरोप केले. तक्रारदार तेच, वकील तेच आणि न्यायाधीशही तेच अस त्यांच झालंय.

सोमय्यांची कबरीला भेट

दरम्यान, याप्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास याकूब मेमनच्या कबरीला भेट दिली. या कबरीचे स्मारक होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

बातम्या आणखी आहेत...