आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गलथानपणा:होळीच्या तोंडावर मुंबई, पुण्यामध्ये शेकडो दुकानदारांच्या स्वप्नांची राख

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
मंत्री नवाब मलिक यांच्यासमोर दुकानदार झाले आक्रमक - Divya Marathi
मंत्री नवाब मलिक यांच्यासमोर दुकानदार झाले आक्रमक

मुंबईच्या भांडूप परिसरातील ड्रीम्स मॉल आणि सनराइज हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी महापालिकेच्या तक्रारीनंतर एचडीआयएलचे राकेश वाधवानसह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या आगीमध्ये शेकडो दुकानदारांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.

आगीच्या घटनेनंतर पालिकेकडून चौकशी करण्यात आली. यात ड्रीम्स मॉलकडे आग परवाना नूतनीकरण झाले नव्हते. काही महिन्यांपूर्वी मुंबई सेंट्रलमधील “सिटी सेंटर मॉल’मध्ये आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडने मुंबईतील सर्व मॉल्समध्ये फायर ऑडिट केले होते. तेव्हा अनेक मॉल्समध्ये फायर सिस्टिम नसल्याचे समोर आले होते. त्यात ड्रीम्स मॉलदेखील होता. फायर ब्रिगेडच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मॉलमध्ये एक हजार दुकाने आहेत. ही आग सुमारे ३६ तासानंतर आटाेक्यात आली.

३१ मार्चपर्यंतच होती रुग्णालयाला मंजुरी : कोरोना रुग्णालय सुरू करण्यासाठी मागच्या वर्षी रुग्णालयांना अटी-शर्तींसह ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. पालिकेने काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील सुरक्षेचा आढावा घेतला होता आणि २८ फेब्रुवारीला बंद करण्याचे आदेश दिले होते. नंतर हा कालावधी वाढवून ३१ मार्च करण्यात आला होता.

या लोकांवर गुन्हा दाखल : याप्रकरणी ड्रीम्स मॉल मॅनेजमेंटच्या राकेश वाधवा (एचडीआयएल, चेअरमन), निकिता त्रेहान (राकेश वाधवाची मुलगी), सारंग वाधवा (राकेश वाधवाचा भाऊ आणि ग्रुपचा एमडी) आणि दीपक शिर्केसह इतर आरोपी असल्याचे पोलिसांनी या वेळी सांगितले.

होळीसाठी भरला ८० लाखांचा माल
या मॉलमध्ये जवळपास ५०० दुकाने आहेत. लग्नसराई आणि होळीसाठी अनेकांनी दुकानांत मोठा माल भरून ठेवला होता. यातील एका महिलेच्या दुकानात जवळपास ८० लाख रुपयांचा माल होता. यात काही रोकडदेखील होती. आता कुटुंबाचा गाडा आम्ही कसा चालवायचा तसेच कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, असा सवाल तिने मंत्री नवाब मलिक यांना केला.

आयुष्यभराची पुंजी लावली होती : एक व्यापारी म्हणाला, मी जन्माची पुंजी दुकानात लावली होती. मात्र, आगीत सर्व भस्मसात झाले आहे. एक महिला म्हणाली, माझी येथे तीन दुकाने होती. यात नव्याने भरलेला मालदेखील होता. काही रोकड गल्ल्यात होती तीदेखील आगीत खाक झाली, असेही ती म्हणाली.

राकेश वाधवान आहे मॉलचा चेअरमन
प्रिव्हिलेज हेल्थकेअर आणि सनराइज ग्रुप मॅनेजमेंट, अमित त्रेहान (राकेश वाधवानचा जावई), निकिता त्रेहान, राकेश वाधवाची मुलगी स्वीटी जैनसह इतरही आरोपी आहेत. एचडीआयएलद्वारे २००९ मध्ये बनवलेल्या या मॉलचे चेअरमन राकेश वाधवान आहेत, तर त्यांची मुलगी निकिता त्रेहान सनराइज ग्रुपची एमडी आहे. तिचे ड्रीम्स मॉलमध्ये सनराइज रुग्णालय होते.

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाचा आढावा घेतला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

पुण्यातील आगीत 500 दुकाने जळून खाक
पुणे| पुण्यातील एमजी राेड येथून लष्कर परिसरात पुनर्वसन झालेल्या फॅशन स्ट्रीट मार्केटला शुक्रवारी रात्री अकरा वाजता भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या १६ वाहनांच्या मदतीने जवानांनी आग अडीच तासात आटाेक्यात आणली. या आगीत सुमारे ४०० ते ५०० दुकाने जळून खाक झाली असून दुकानदारांचे काेट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रात्रभर आग विझविणाऱ्या अधिकाऱ्याचा झाला मृत्यू
फॅशन स्ट्रीट येथे लागलेली आग आटाेक्यात आणण्यासाठी शनिवारी मध्यरात्री प्रयत्न करत असलेले कॅँटाेनमेंट बाेर्डचे अधिकारी प्रकाश हासबे (६०) आग आटाेक्यात आल्यानंतर घरी परतताना येरवडा परिसरात त्यांचा अपघात हाेऊन दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. हासबे हे पुणे कँटाेन्मेंट बाेर्डचे अग्निशामक दलाचे प्रमुख हाेते. आगीची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आल्यानंतर ते घरी जात होते. या वेळी त्यांना एका बसने जोरदार धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...