आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडघम:मुंबईसाठी आशिष शेलार हाच भाजपचा चेहरा! राज्यातील भाजप नेते दिल्लीत, वरिष्ठांसोबत खलबते

मुंबई / मकरंद दंडवते2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर बदल आणि मनसेसोबत संभाव्य युतीसाठी राजधानी दिल्लीत हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र या सर्व घडामोडीत वांंद्रे पश्चिमचे आमदार तथा भाजपचे मुख्य प्रताेद अॅड.आशिष शेलार यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची धुरा येण्याची दाट शक्यता आहे.

कोरोनाचा प्रभाव कमी होताच मुंबई, नवी मुंबई, औरंगाबादसह राज्यातील १० महापालिका तसेच जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. सन २०२२ च्या पहिल्या तीन महिन्यांत निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता असून भाजपने त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपला अनपेक्षितपणे जोरदार झटका बसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईतून शिवसेनेची सत्ता उलथवून टाकल्यास राज्यातील एकूण राजकारणाचा नूरच पालटू शकतो. त्यामुळेच मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपच्या दृष्टीने ‘करो अथवा मरो’ची लढाई ठरली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली आहे. मात्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा कालावधी तीन वर्षांचा असून चंद्रकांत पाटील यांची मुदत पुढील वर्षी जुलैपर्यंत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता कमीच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शनिवारी पुण्यात प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही असे स्पष्ट केले आहे. वास्तविक दिल्लीतील हालचालींमध्ये मुंबई मनपा निवडणूक ही केंद्रस्थानी असून स्थानिक नेता म्हणून आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिली जाऊ शकते.

२०१७ च्या निवडणुकीत भाजप दुसऱ्या स्थानी : मुंबईत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी आक्रमक चेहरा म्हणूनही आशिष शेलार यांच्याकडे पाहिले जाते. मुंबई शहराध्यक्षपदावर असताना सन २०१७ च्या पालिका निवडणुकीत शेलार यांनी भाजपला सत्तेनजीक पोहोचवले होते. या निवडणुकीत शिवसेनेखालोखाल भाजपला २७.३२ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेला २८.२९ मते मिळाली होती. त्या वेळी राज्यात भाजप-सेना युती असल्याने भाजपने महापौरपदावरचा हक्क सोडला होता यंदा मात्र हे दोन्ही पक्ष प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकणार आहेत.

मनसेसोबत युतीची शक्यता कमीच : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मनसेसोबत युती करण्यासाठी आग्रही आहेत, परंतु मनसेचा मुंबई-कल्याण-डोंबिवलीबाहेर प्रभाव अगदीच कमी आहे. मनसेसोबत गेल्यास मंुबईतील भाजपचा पारंपरिक गुजराती, परप्रांतीय मतदार दुखावला जाऊ शकतो. हे भाजपला परवडणारे नाही. शिवाय राज ठाकरेंसारख्या आक्रमक, ‘करिश्माई’ नेतृत्वासोबत जुळवून घेणे भाजप नेत्यांना कितपत पेलवेल ही शंका आहे. त्यामुळे अॅड.शेलार यांच्याकडे मुंबई निवडणुकीची धुरा द्यावयाची असल्यास मनसेसोबत जाण्याचा निर्णयही त्यांच्या सल्ल्यानुसारच घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचा मुंबईत प्रभाव कमी
सन २०१७ च्या निवडणुकीत भाजपचा चेहरा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मुंबई निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळली होती. परंतु त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. पहाटेचा शपथविधी, पक्षातील ओबीसी नेत्यांची नाराजी यामुळे फडणवीस यांची प्रतिमाही तेव्हासारखी नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हा पक्षाचा ‘मराठा चेहरा’ असला तरीही आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत भाजपला आलेले अपयश, वारंवार केली जाणारी वादग्रस्त वक्तव्ये आणि मुंबईतच नव्हे तर आपल्या कोल्हापूर शहरातही त्यांचा प्रभाव नसल्याने त्यांचे नाव मागे पडले आहे.

पश्चिम बंगालचा धडा : आता निवडणुकीत स्थानिक नेत्याला प्राधान्य
स्थानिक नेत्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत दिसून आल्याने मोदी-शहा हे मुंबई पालिकेसाठी स्थानिक चेहऱ्यालाच प्राधान्य देण्याच्या मन:स्थितीत आहेत. शिवसेनेची मुंबईत संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. काँग्रेसने भाई जगताप यांच्यासारख्या स्थानिक चेहऱ्याला शहराध्यक्षपद आणि निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे पक्ष अॅड.शेलार यांच्याकडे निवडणुकीची धुरा सोपवण्याच्या मन:स्थितीत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...