आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पलटवार:काँग्रेसने कर्नाटकात लांगुलचालनाचा प्रकार केला, तेच ठाकरे महाराष्ट्रात करणार; आम्ही निकराचा संघर्ष करु-आशिष शेलार

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. लांगुलचालनाचा जो प्रकार काँग्रेसने कर्नाटकात केला ती अपेक्षा संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्रात आहे. मात्र आम्ही निकराचा संघर्ष करु असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. हनुमानाला प्रचारात उतरवले होते, मात्र बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली. देशाच्या मन की बात कर्नाटकातून समोर आली, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक निवडणुकांच्या निकालावरुन भाजपवर टीका केली आहे. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

आनंदाच्या उकळ्या फुटत असतील

संजय राऊत यांच्या टीकेला आता नीतेश राणेंनंतर आशिष शेलार यांनी देखील प्रत्यु्त्तर दिले आहे. आशिष शेलार म्हणाले, संजय राऊतांनी पुढची मागणी करावी. काँग्रेस जिंकल्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या असतील. दुसऱ्याच्या घरी काही झाल्यावर ठाकरे आणि राऊत पेढे वाटतात.

अकांडतांडव करतील

आशिष शेलार म्हणाले, आता उद्धव ठाकरे केरळ स्टोरीला बंदीची मागणी करतील, बजरंग दलावर बंदीची मागणी करतील. पत्रकार परिषद घेऊन अकांडतांडव करतील. मात्र जो लांगुलचालनाचा प्रकार काँग्रेसने कर्नाटकात केला तोच राऊत-ठाकरे यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. मात्र आम्ही याविरोधात लढा देऊ.

संजय राऊतांमुळे ते उमेदवार पडले

आशिष शेलार म्हणाले, पृथ्वीराज चव्हाणांना चष्मा घातला तेच दिसते. त्यांनी स्वतःला आलेल्या अपमानाचा अनुभव दुसऱ्याच्या तोंडी घातला आहे. तसेच कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे उमेदवार पराभूत झाले ते संजय राऊतांमुळेच पडले, असा टोला यावेळी शेलार यांनी लगावला.

संबंधित वृत्त

पराभव मान्य करा:हनुमानाला प्रचारात उतरवले, पण बजरंगबलीची गदा भाजपच्याच डोक्यावर पडली; संजय राऊतांचा मोदी-शहांना टोला

हनुमानाला प्रचारात उतरवले होते, मात्र बजरंगबलीची गदा भाजपच्या डोक्यावर पडली. कर्नाटकचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा आहे. देशाच्या मन की बात कर्नाटकातून समोर आली, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर