आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेब्रुवारी २०२१ पासून रिक्त असलेले विधानसभा अध्यक्षपद आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरले जाणार आहे. त्यासाठी ९ मार्च रोजी निवडणूक घेण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यपालांकडे या निवडणुकीस मंजुरी द्यावी यासाठी गुरुवारी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
येत्या ३ ते २५ मार्चदरम्यान मुंबईत यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असून ११ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. हिवाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे निश्चित झाले होते. २७ किंवा २८ डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार होती. तसा प्रस्ताव राज्यपाल यांना पाठवण्यात आला होता. मात्र त्याला अनुमती मिळाली नसल्याने निवडणूक होऊ शकली नव्हती. काँग्रेसकडून भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी अशा तिघांचा अध्यक्षपदासाठी विचार होऊ शकतो.
निवडणूक पद्धतीबाबत राज्यपालांचा आक्षेप
विधानसभेत महाविकास आघाडीकडे २८८ पैकी १७० इतके संख्याबळ आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीला अडचण नाही. पण काही मते फुटू नयेत यासाठी अध्यक्ष निवड आवाजी मतदानाने घेण्याचा सत्ताधारी आघाडीचा मानस आहे. परंतु निवडणूक नियमातील बदलाबाबत राज्यपालांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे डिसेंबरमध्ये ही निवडणूक पुढे ढकलण्याची वेळ आली होती. आता ही निवडणूक कशी होणार हासुद्धा मोठा विषय आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.