आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवलेंचा राज ठाकरेंना टोला:म्हणाले - सभा घेण्यात एक्सपर्ट पण मत मिळवण्यात नाही, झेंड्याप्रमाणे ते स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलताहेत

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण पेटलं आहे. जोपर्यंत भोंगे उतरत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील, असे मनसेने म्हटले आहे. त्यावर आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत. भगवा रंग हा शांतीचा वारकरी सांप्रदायाचा रंग आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यावं. राज ठाकरे यांच्या भोंग्या संबंधातील भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही, अशा शब्दात आठवलेंनी राज ठाकरेंवर टीका केली.

बाळासाहेबदेखील सभा घ्यायचे. तसेच राज ठाकरे यांच्या सभाही मोठ्या होतात. राज ठाकरे सभा घेण्या एक्सपर्ट आहेत. पण, मत मिळवण्यात नाहीत. त्याचा फक्त एकच आमदार आहे. त्यामुळे कर्मठ भूमिका घेऊन राज ठाकरेंनी समाजात भेद निर्माण करू नये. सर्वांना सोबत घेत आपला पक्ष चालवावा, असेही आठवले म्हणाले. शिवाय, राज ठाकरे यांना एनडीएमध्ये घेण्याची गरज नाही. रिपाइं मोदी सरकार बरोबर असताना राज ठाकरे यांची गरजच काय? असेही आठवले यांनी म्हटले.

राज ठाकरे बाळासाहेबांना कॉपी करू शकत नाही -
बाळासाहेब हे फार वेगळं नेतृत्व होतं, मशिदीवरील भोंगे काढा अशी भूमिका कधी बाळासाहेबांनी घेतलेली नव्हती. त्यांनी नेहमी मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला होता. फक्त दहशतवादी मुस्लिमांना त्यांचा विरोध होता. राज ठाकरे बाळासाहेबांना कॉपी करू शकत नाही. बाळासाहेबांची कॉपी करणं एवढं सोप्प काम नाही, असे आठवले यांनी म्हटले.

संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी ही आमची भूमिका -
भीमा कोरेगाव दंगल ही जाणीवपूर्वक घडवली होती. त्या दंगलीचा आणि एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही. संभाजी भिडे यांना क्लिन चीट मिळाली असेल, कारण त्यांच्याविरोधात पुरावे नसतील. संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे. भीमा कोरेगाव हा विषय राज्याचा आहे. त्यामुळे गृह मंत्र्यांना भेटून संभाजी भिडेंची फेर चौकशीची मागणी करणार करणार आहे, असे आठवले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...