आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे कुटुंबीयांना घेरण्याचा प्रयत्न, ‘आदित्य’च्या बदनामीचा डाव : शिवसेनेचा प्रत्यारोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतची आत्महत्या नव्हे हत्याच, मॅनेजर दिशाचाही खून - राणेंचा आरोप

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजकीय हाडवैरी भाजप खासदार नारायण राणे, तसेच बिहारमधील जदयू-भाजप सरकार सक्रिय झाले आहे.

सुशांत याची आत्महत्या नसून हत्याच आहे. त्याचप्रमाणे त्याची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला, असा सनसनाटी आरोप राणे यांनी केला असून हे प्रकरण दडपण्यासाठी महाविकास आघाडीतील एका मंत्र्याने दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी त्यांचा रोख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंकडे होता. दरम्यान, या प्रकरणाशी संबंध जोडून आदित्य यांना बदनाम केले जात आहे, असा प्रत्यारोप शिवसेनेने केला आहे. तर ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक आरोपांचा धुरळा उडवीत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

दबाव आणणारा तो नेता कोण हे सर्वांना माहीत आहे : राणे

नारायण राणे यांनी मंगळवारी प्रदेश भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सुशांतसिंह याने आत्महत्या करण्यापूर्वी ८ जून रोजी अभिनेता आदित्य पांचाेली याच्या घरी पार्टी झाली होती. त्याला कोण कोण मंत्री व अभिनेते हजर होते, त्यांची नावे पोलिसांनी जाहीर करावीत. दिशा सॅलियनचे शवविच्छेदन तीन दिवस विलंबाने करण्यात आले. सरकारमधील एका मंत्र्याने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप राणे यांनी केला.

कोरोनाच्या यशाच्या पोटदुखीतून माझ्यावर चिखलफेक

कोरोना संकटाचा हाहाकार असताना महाराष्ट्र सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारचे यश अनेकांना खुपते आहे. त्यामुळे सुशांतसिंह प्रकरणात माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबीयांवर चिखलफेक केली जाते आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या संपूर्ण प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही, अशा प्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल, या भ्रमात कोणी राहू नये,’ असा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

वहिनींचे वक्तव्य आश्चर्यजनक

कोरोनाबाबत अवाक्षरही न काढणाऱ्या अमृतावहिनी एका आत्महत्या तपासावरून मुंबई सुरक्षित राहिली नाही, असे वक्तव्य करतात. हे आश्चर्यजनक आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

...तर, अमृता फडणवीस यांनी राज्य सोडून जावे

पाच वर्षे राज्य फडणवीस सरकारच्या हाती होते. मुंबई पोलिस त्यांच्या अधिकारात होते. तरी मुंबई पोलिसांवर माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा विश्वास नसेल तर अमृता फडणवीस यांनी राज्य सोडून जावे, असा सल्ला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री परब यांनी दिला आहे.

चौकशीला सामोरे जाण्यास तयार

सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव विनाकारण जोडले जात आहे. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. - अनिल परब, शिवसेना नेते

बातम्या आणखी आहेत...