आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अयोध्या वारी; आघाडीत कुरबुरी:धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक कार्यक्रमाला जाऊ नये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंदिर नाही, मग मशिदीच्या भूमिपूजनाला जावे का? शिवसेनेने राष्ट्रवादीला ठणकावले

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या वारीवरून महाविकास आघाडीत अपेक्षेप्रमाणे कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून उद्धव ठाकरे यांना भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण देण्याची तयारी सुरू असल्याचे कळताच महाविकास आघाडीच्या आतापर्यंत सुरळीत सुरू असलेल्या संसारात मिठाचा खडा पडला अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आता अधिक टोकदार होत चालला अाहे. धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक कार्यक्रमाला जाऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार अॅड. माजिद मेमन यांनी दिला आहे. मेमन यांच्या अनाहूत सल्ल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या नाही तर मग मशीद, चर्चच्या भूमिपूजनाला जायचे का, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

भाजपचे खिजवणे सुरूच : ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीची परवानगी घ्यावी

> अयोध्येला जाण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची परवानगी काढावी लागेल, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

> आघाडी सरकार स्थापन करण्यापूर्वी आणि स्थापन झाल्यावर असे दोन वेळा उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. या वेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे खासदार आणि काही आमदारदेखील होते.

धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक कार्यक्रमाला जाऊ नयेराष्ट्रवादी काँग्रेस : मुख्यमंत्र्यांना सल्ला

‘कुलदेवतेला जाणे गोष्ट वेगळी. त्याला आमचा आक्षेप नाही. पण, भाजप अयोध्येचे राजकारण करत आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण न आल्यास अयोध्येला जाऊ नये’, असे आवाहन काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केले आहे.

मंदिर नाही, मग मशिदीच्या भूमिपूजनाला जावे का? शिवसेना : राष्ट्रवादीला ठणकावले

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जायचे नाही, तर मग मशिदीच्या, चर्चच्या भूमिपूजनासाठी जायचे का ?’ महाविकास आघाडीचे सरकार भाजपच्या विरोधात एकत्र आले आहे. त्यामुळे शिवसेनेने आपला हिंदुत्वाचा अजेंडा सोडण्याचा विषयच येत नाही’, असे शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातील आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.

काय म्हणतात...आघाडीच्या घटक पक्षांतील नेते

व्यक्ती म्हणून आपला धर्म पाळण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार आहे. पण, लोकशाही व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणे टाळावे, असे आवाहन अॅड. मेमन यांनी केले आहे.

‘कुलदेवतेला जाणे गोष्ट वेगळी. त्याला आमचा आक्षेप नाही. पण, भाजप अयोध्येचे राजकारण करत आहे. म्हणून उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण न आल्यास अयोध्येला जाऊ नये’, असे आवाहन काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केले आहे.

अयोध्येला जाणे हा आघाडीचा अजेंडा नाही

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जातील, असे सांगतानाच किमान समान कार्यक्रमावर सरकार चालवणे हा महाविकास आघाडीचा अजेंडा आहे. अयोध्येला जाणे न जाणे हा काही महाविकास आघाडीचा अजेंडा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाण्याबाबत मतभेद असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचा इरादा स्पष्ट केला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेतेे गप्प

अयोध्या प्रश्नावरून राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते बोलायला तयार नाहीत. तर, अॅड. माजिद मेमन यांचे आवाहन हे त्यांचे वैयक्तिक असल्याचे राष्ट्रवादीचे नेते खासगीत सांगत आहेत. एकूण, राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यावरून महाविकास आघाडीत मतभेदांची दरी रुंदावल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.