आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित पवारांचा भाजप-मनसेवर निशाणा:धर्माला चुकीच्या पद्धतीने राजकारणाशी गुंफण्याचा प्रयत्न सुरू; श्रद्धेचा राजकीय आखाडा बनवू नका

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज देशात काही घटकांकडून जाणीवपूर्वक धर्माला चुकीच्या पद्धतीने राजकारणाशी गुंफण्याचा प्रयत्न केला जातोय, तो योग्य नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. फेसबूक पोस्ट करत आपल्या अयोध्या दौऱ्यावर रोहित पवारांनी भाष्य केले.

गेल्या चार दिवसांपासून रोहित पवार सहकुटुंब अयोध्येत होते. चार दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी गेलेल्या रोहित पवार यांनी आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर आज ही पोस्ट लिहिली. रोहित पवार पोस्टमध्ये म्हणतात की, राजकीय जीवनात कार्यरत असल्याने माझ्या प्रत्येक कृतीकडे राजकीय चष्म्यातून बघणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे मनात तीव्र इच्छा आणि श्रद्धा असूनही अयोध्येला जावे की नाही, असा विचार क्षणभर मनात येऊन गेला. पण शेवटी श्रद्धा महत्त्वाची असल्याने कुणाचाही विचार न करता आज अयोध्येत दाखल झालो.

रोहित पवार पोस्टमध्ये पुढे म्हणतात, दोन मित्र, नातलग, स्नेही, ओळखीचे यांची भेट झाली तरी ‘राम-राम या उच्चारानेच त्यांच्यातील संवादाची सुरुवात होते. थोडक्यात काय तर आपल्या सर्वांसाठीच श्रीराम हे नाव आणि अयोध्या हे पवित्र स्थान आहे. प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा, निष्ठेचा हा विषय आहे. परंतु लोकांच्या याच श्रद्धेला हात घालून त्याचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर कसा करता येईल, असा एक प्रयत्न विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून करण्यात येत आहे आणि सर्वांसाठी श्रद्धेय असलेल्या या स्थळाला राजकारणाचा आखाडा बनवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. अयोध्येचे अध्यात्मिक महत्त्व विसरुन फक्त राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत आणि यामुळे भाविक मात्र गोंधळून गेलाय. हे चित्र बदलण्याची गरज आहे, असे मला वाटते.

रोहित पवार म्हणाले की, धर्म, श्रद्धा, भक्ती हे प्रत्येकाचे व्यक्तिगत विषय आहेत आणि प्रत्येकाला ते जपण्याचा आणि जोपासण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणी याचा राजकीय आखाडा बनवत असेल तर ते योग्य नाही. आज देशात काही घटकांकडून जाणीवपूर्वक धर्माला चुकीच्या पद्धतीने राजकारणाशी गुंफण्याचा प्रयत्न केला जातोय, तोही योग्य नाही. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून धार्मिक मुद्द्यांवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांची ही यात्रा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...