आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजीचा सूर:मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदारांमध्ये अस्वस्थता, मात्र बंडखोरी होईल एवढी नाही- बच्चू कडू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारमधील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. पण, बंडखोरी होण्याइतकी नाही, असे माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत. शिंदे- फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झाला नाही. त्यामुळे आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

“मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याने नाराजी असण्याचे कारण नाहीच. 2024 नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता आहे, इथेपर्यंत ठिक आहे. पण, बंडखोरी होईल, अशी अस्वस्थता नाही. आमच्यातही कधी नाराजीचा सूर येतो, पण कालांतराने जातो,” असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

अडचणी वाढतायत

सध्या अडचण पालकमंत्र्यांची आहे. एका जिल्ह्याला एक पालकमंत्री असेल तर त्या जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावायला सोपं जातं. पण एकाच व्यक्तीकडे 8-9 जिल्हे असल्याने लोकांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. हे मात्र खरं आहे,” असे बच्चू कडू म्हणाले.

शिंदे फडणवीस सरकारमधील दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता होती. पण अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया दिली.

जैसे थे सरकार चालवा

बच्चू कडू म्हणाले, आमच्या सरकारचा कार्यकाळ सात ते आठ महिने उरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार करून नाराजी ओढावून घेण्याची मानसिकता सरकारची नाही. म्हणून मला वाटतं, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापेक्षा जैसे थे स्थितीत सरकार चालवणं योग्य आहे.

आयाेध्या दौरा

शिंदे गटातील अनेक आमदार अयोध्या दौऱ्यावर गेले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या गटात अस्वस्थता आहे, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्याबद्दल विचारले असता बच्चू कडूंनी म्हटले, “प्रभू श्री रामचंद्राबद्दल आमच्या मनात प्रचंड आस्था आहे. मला अयोध्येला जाण्याची इच्छा होती. पण, मार्केट समितीच्या निवडणुका असल्याने त्याची आखणी करत होतो. तसेच, रोगनिदान शिबिरही असल्याने अयोध्येला जात आले नाही.”