आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूब मेमनबद्दल सहानुभूती नाही!:बडा कब्रस्तानच्या ट्रस्टींची स्पष्टोक्ती, म्हणाले - कबरींची पडझड रोखण्यासाठी संगमरवरी दगड लावले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

याकूब मेमनबद्दल आम्हाला सहानुभूती नाही. त्याने देशाचे मोठे नुकसान केले. त्याला कोणत्याही प्रकारची सुविधा आम्ही का देऊ?, अशी प्रतिक्रिया बडा कब्रस्तानचे विश्वस्त शोएब खतीब यांनी दिली आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीची सजावट करण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

यावर शोएब खतीब यांनी सांगितले की, रात्री अंधारात मृताच्या नातेवाईकांना त्रास होऊ नये यासाठी कब्रस्तानमध्ये दिवे लावले होते. मात्र, वाद निर्माण झाल्याने ते आता काढले आहेत. तसेच, अनेक कबरींची पडझड होत असल्याने ते रोखण्यासाठी 4 वर्षांपूर्वीच दगड लावले आहेत.

बातम्या खोट्या

कब्रस्तानचे विश्वस्त शोएब यांनी सांगितले की, याकुब मेमनच्या कबरीवर दिवा आणि संगमरवरी दगड लावले, या बातम्या खोट्या आहेत. याकूबच्या कबरीसाठी विशेष काही केले नाही. बडा कब्रस्तानमध्ये अनेक कबरींना संगमरवरी दगड लावण्याची प्रक्रिया सामान्य आहे.

5 वर्षांपूर्वी डागडुजी
शोएब खतीब म्हणाले, कब्रस्तानमध्ये जेथे याकूब मेमनची कबर असल्याचे सांगितले जाते, तेथे त्याच्या कबरीशिवाय मेमन कुटुंबातील एकूण 17 कबरी आहेत. याकुब मेमनची विशेष कबर तेथे नाही. तेथे कोणतीही मजार किंवा दर्गा बांधण्याचीही तरतूद नाही. पूर्वी कबरेच्या सीमेभोवती आणि वर काळा मार्बल होता. झाडामुळे किंवा अन्य कारणामुळे त्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे कबरीची माती बाहेर येत होती. त्यामुळे याकूब मेमनच्या दूरच्या नातेवाईकाने त्याची पडझड रोखण्याची विनंती केली होती. त्यानुसार जवळपास 5 वर्षांपुर्वी आवश्यक ती प्रक्रिया करण्यात आली. तेव्हाच ते संगमरवरी दगड लावले होते. ते आता लावलेले नाहीत. तसेच, तेव्हाही ते दगड विशेष याकूबच्या कबरीसाठी लावले नव्हते.

व्हायरल व्हिडिओचे सत्य

विश्वस्त शोएब म्हणाले, याकूबच्या कबरीवर एलईडी दिवे लावल्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडिओ इस्लाममधील मोठी रात्र म्हणजे शब-ए-बरातचा आहे. कोविडमुळे गेल्या तीन वर्षांपासून तेथे प्रार्थना होत नव्हती. यंदा मात्र, बडा कब्रस्तानबरोबरच मुंबईतील सर्व कब्रस्तानमध्ये दिवे बसवण्यात आले आहेत. कबरस्तानमध्ये येणाऱ्यांच्या सुविधेसाठी हे दिवे लावण्यात आले आहेत.

वाद झाल्यामुळे दिवे काढले

शोएब खतीब म्हणाले, कबरींवरील दिव्यांबाबत ट्रस्टकडून कोणतीही परवानगी दिली जात नाही. जिथे दिवे लावल्याचे सांगितले जात आहे, तिथे गुसलखाना आहे. रात्री मृतदेह आणताना अंधारामुळे मृतांच्या नातेवाईकांना त्रास होऊ नये म्हणून दिवे लावण्यात आले आहेत. मात्र, आता वाद निर्माण झाल्यामुळे दिवे काढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...