आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा मुक्ताफळे:'गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही', शिर्डीच्या साईबाबांविषयी बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधान

जबलपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांबद्दल बागेश्वर बाबांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

'साईबाबा ईश्वर नाही'

जबलपूर येथील एका कार्यक्रमात शिर्डीच्या साईबाबांची पूजा करावी की नाही, अशी विचारणा एका भक्ताने केली. त्यावर बागेश्वर बाबा म्हणाले, हिंधू धर्माचे शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्य यांचे मत मानणे अनिवार्य आहे. त्यांच्या मताचे पालन करणे प्रत्येक सनातनी व्यक्तीचे कर्तव्य आहे. कारण शंकराचार्य हे धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचे स्थान देता येणार नाही.

संत म्हणा किंवा फकिर

बागेश्वर बाबा केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे ते म्हणाले, गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता (गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही.) बागेश्वर बाबा म्हणाले, संताची पूजा करायची तर हिंदूंमध्ये संत कमी आहेत का? तुलसीदास, सूरदास किंवा इतर कोणतेही संत असोत ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. त्याचप्रमाणे साईबाबा हे संत असू शकतात, फकिर असू शकतात. मात्र, ईश्वर नाही. गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही.

भावना दुखवायच्या नाहीत

पुढे बागेश्वर बाबा म्हणाले, मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. परंतु मी हे बोलणेदेखील गरजेचे आहे की, गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही. याला लोक वादग्रस्त वक्तव्य म्हणतील पण हे बोलणे खूप गरजें आहे. आपण साईबाबांना संत, फकिर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही.

रोहित पवारांकडून निषेध

दरम्यान, बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच, यावरुन भाजपवरही टीका केली आहे. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधाने करायला लावायची, जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा आणि नॉन इश्यूवर चर्चा घडवून मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचे आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचे पहिल्यापासूनच धोरण राहिल आहे. भाजपने बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

तुकाराम महाराजांबद्दलही केले होते वादग्रस्त वक्तव्ये

संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे यापूर्वी बागेश्वर बाबा यांनी उधळली होती. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध केला होता. त्यानंतर बागेश्वर बाबांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.