आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशंभर कोटी रुपयांच्या कथित खंडणी वसुलीच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे ७४ वर्षीय नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मुंबई हायकोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. मात्र या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिलासाठी सीबीआयकडून मुदत मागण्यात आल्यामुळे न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दहा दिवसांसाठी स्थगिती दिली. तोपर्यंत देशमुखांना आर्थर रोड तुरुंगातच राहावे लागेल.
ईडी व सीबीआयने स्वतंत्र गुन्हे असलेले देशमुख २ नोव्हेंबर २०२१ पासून अटकेत आहेत. ईडीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात हायकोर्टाने ७० दिवसांपूर्वी ४ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता, पण सीबीआयच्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात दिलासा न मिळाल्याने अनिल देशमुख तुरुंगातच राहिलेे. आता त्यांची प्रकृती खालावत असल्याचे वकिलांनी सांगितल्यानंतर न्या. एम.एस. कर्णिक यांनी सोमवारी काही अटी-शर्तींसह दुसऱ्यांदा जामीन मंजूर केला.
एक लाखाचे हमीपत्र, दर आठवड्याला हजेरी
अॅड. इंद्रपाल सिंग म्हणाले, ‘एक लाखाच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुखांना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. मुंबईबाहेर न जाणे, पासपोर्ट जमा करणे व दर बुधवारी सीबीआय कार्यालयात हजेरी लावणे या अटी जामीन देताना घालण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टातूनही देशमुख यांना दिलासा मिळेल अन् ते बाहेर येतील, असेही वकिलांनी सांगितले.
लाडू वाटप करणाऱ्या समर्थकांचा काढता पाय
देशमुख यांना जामीन मिळाल्याचे कळताच सकाळी नागपुरातील त्यांच्या घरासमोर राष्ट्रवादीच्या ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी जल्लोष करत लाडू वाटप केले. मात्र काही वेळातच या निर्णयाला १० दिवसांसाठी स्थगिती मिळाल्याचे वृत्त धडकले अन् निराश झालेल्या समर्थकांची पांगापांगी झाली. नंतर हे कार्यकर्ते शरद पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.