आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:देशकार्यासाठी एकत्र आले भिन्न गायनशैलीचे दाेन नटश्रेष्ठ; अन् रंगला संगीत नाटकाच्या इतिहासातील अविस्मरणीय प्रयाेग

मुंबई / प्रिया फुलंब्रीकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
केशवराव भोसले आणि बालगंधर्व. - Divya Marathi
केशवराव भोसले आणि बालगंधर्व.
  • बालगंधर्व अन् केशवराव भोसलेंच्या अभिनयाने नटलेल्या ‘संगीत संयुक्त मानापमान’ नाटकाची शंभरी

बरोबर शंभर वर्षांपूर्वी मुंबईत ग्रँट रोडवरील बालीवाला ग्रँड थिएटरमध्ये मराठी संगीत नाटक इतिहासातील एक अविस्मरणीय नाट्यप्रयोग रंगला होता आणि तो नाट्यप्रयोग होता “संगीत संयुक्त मानापमान’ या नाटकाचा! या आगळ्यावेगळ्या प्रयोगाच्या आठवणी मास्टर कृष्णराव यांची पणती प्रिया फुलंब्रीकर यांनी जागवल्या. संयुक्त मानापमान नाटकाचा शताब्दी दिन हा या सर्व सोनेरी आठवणींना शब्दबद्ध करण्याचे औचित्य ठरला.

८ जुलै १९२१ रोजी रंगमंचावर हा संगीत नाट्यप्रयोग झाला; परंतु हा प्रयोग प्रत्यक्षात येण्याआधी पडद्यामागे बरेच नाट्य घडले होते. लोकमान्य टिळक यांचे १९२० मध्ये महानिर्वाण झाले. त्यानंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून देश कार्यासाठी “टिळक स्वराज्य फंड’ ची स्थापना केली. या फंडाच्या आर्थिक मदतीकरिता बालगंधर्व, मास्तर कृष्णराव (ऊर्फ कृष्णा मास्तर) फुलंब्रीकर, केशवराव भोसले या सर्वांचे फॅमिली डॉक्टर असलेले आदरणीय डॉ.रामकृष्णहरी भडकमकर यांना कल्पना सुचली की ‘गंधर्व नाटक मंडळी’तील आघाडीचे नट बालगंधर्व व “ललित कलादर्श’चे आघाडीचे नट केशवराव भोसले ह्या दोन कलावंतांनी एकत्र येऊन या फंडाच्या मदतीसाठी संयुक्त मानापमान नाटकाचा प्रयोग करावा. दोघांनी एकत्र येऊन मानापमान करण्याच्या गोष्टीला काही मान्यवरांनी विरोध केला. कारण या दोन थोर कलावंतांची विरुद्ध अंगाची गायकी आणि अगदी भिन्न गायनशैली. बालगंधर्व यांचा आवाज ऋजू व गायकी आत्यंतिक सुरेल आणि लडिवाळ. याउलट केशवराव यांचा आवाज आत्यंतिक सुरेल पण वरच्या पट्टीतील आणि आक्रमक. केशवरावांची जोरकस तानांची गायकी ही त्यांचे गुरू पं. रामकृष्ण वझेबुवा यांच्या पठडीत घडवलेली. परंतु या विरोधास न जुमानता बालगंधर्व गुपचूप केशवरावांना भेटले व ही कल्पना त्यांना बोलून दाखवली. त्यांनी त्या गोष्टीस तत्काळ होकार दिला. शेवटी दोघांनी मिळून हे नाटक करायचे ठरवलेच. एवढे सगळे पडद्यामागे नाट्य घडल्यानंतर अखेरीस केशवराव (धैर्यधर) आणि नारायणराव राजहंस अर्थात बालगंधर्व (भामिनी) असा संयुक्त मानापमान नाटकाचा प्रयोग ठरवल्याप्रमाणे रंगभूमीवर सादर झाला व त्यास प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. धैर्यधराच्या भूमिकेतील केशवरावांची आणि बालगंधर्वांची पदे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला व ठरल्याप्रमाणे या दोन्ही नाटक कंपन्यांनी त्याचे सर्व उत्पन्न टिळक स्वराज्य फंडाला मदत म्हणून दिले.

दिग्गज कलावंतांनी मिळून सादर केलेला हा नाट्यप्रयोग यशस्वी झाल्यावर ऑगस्ट १९२१ मध्ये संयुक्त सौभद्र नाट्यप्रयोगदेखील असाच यशस्वी झाला. त्या संयुक्त सौभद्र नाटकात कृष्णा मास्तरांनी नारदमुनींची भूमिका साकारली होती.

कृष्णा मास्तर मूळचेच चतुर. त्यामुळे नाटकातील गाणे असो वा मैफलीतील, त्यात रंग कसा भरायचा ही कला त्यांना चांगली अवगत होती. शिवाय त्यांच्या गायकीवर संस्कार स्वरभास्कर गुरुवर्य बखलेबुवांचे. त्यामुळे मास्तरांनी या नाटकात वेगळाच प्रयोग केला तो म्हणजे कायम स्वतःच्या पट्टीत व लयीत गाणाऱ्या मास्तरांनी चलाखीने आपली पट्टी वरची ठेवून म्हणजे मध्यमाचा षड्ज करून त्यांची पदे गायली. या प्रसंगाचे वर्णन मास्तरांना गुरुस्थानी मानणाऱ्या संगीतकार वसंत देसाई यांनी मास्तरांच्या षष्ट्यब्दीपूर्ती समारंभाच्या ध्वनिमुद्रित भाषणात पुढीलप्रमाणे केले, “मास्तरांनी पहिल्यांदाच आपल्या नेहमीच्या पट्टीतल्या मध्यमाला षड्ज करून आपली गाण्याची पट्टी वर केली होती. एकीकडून केशवराव कौतुकाने बघत आहेत आणि दुसरीकडून नारायणराव. आज हे काही निराळे म्हणून बघतायत.’

बातम्या आणखी आहेत...